मुंबई, 02 जानेवारी: रेल्वेने अथवा लोकलने प्रवास करत असताना योग्य ती सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. अन्यथा एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. अनेकदा लोकं लोकलने प्रवास करताना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रीजचा वापर करण्याऐवजी रेल्वे ट्रॅकचा वापर करतात. यामुळे अनेकदा त्यांना जीव गमवावा लागतो. असाच एक प्रकार काल मुंबईतील दहिसर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रीजचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे ट्रॅक ओलांडला आहे. मुंबई पोलिसातील एका जवानाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला आहे.
या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकता, या प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावला आहे. एक सेकंद जरी विलंब झाला असता तर रेल्वे ट्रॅक ओलांडणं त्याच्या जीवावर बेतलं असतं. संबंधीत प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याची चप्पल निसटली. ती चप्पल घेण्यासाठी त्याला परत दुसऱ्या बाजूला जावं लागलं. चप्पल घातल्यानंतर त्यानं पुन्हा प्लॅटफॉर्म चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक लोकल अगदी त्याच्या जवळ आली होती.
#WATCH | Maharashtra: A constable of Mumbai Police helped a 60-year-old man, who got stuck at a railway track, save his life at Dahisar railway station in Mumbai yesterday. pic.twitter.com/lqzJYf09Cj
— ANI (@ANI) January 2, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत सोळंकी असं या प्रवाशाचं नाव आहे. हा प्रवासी खारला जाण्यासाठी दहिसर स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत उभा होता. दरम्यान खारला जाणारी लोकल धीम्या गतीने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत होती. ही लोकल पकडण्यासाठी प्रवासी पटकन प्लॅटफॉर्म 4 वरून प्लॅटफॉर्म 2 कडे गेला. यावेळी त्यानं प्लॅटफॉर्म 2 कडे जाण्यासाठी ब्रीज वापरण्याऐवजी रेल्वे ट्रॅक ओलांडू लागला. ट्रॅक ओलांडताना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर विरार स्लो लोकल आली. तेव्हा हा प्रवासी पटकन प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होता.
त्याचा जीव धोक्यात असलेला पाहून रेल्वेस्थानकावर कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी एस. बी. निकम यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला लोकलसमोरून ओढून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. यावेळी एका क्षणाचाही विलंब झाला असता तर या प्रवाशाच्या जीवावर बेतलं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.