Home /News /mumbai /

पुन्हा तेच अंधारमय दिवस! PSIच्या निधनानंतर मुंबई पोलीस दलात खळबळ

पुन्हा तेच अंधारमय दिवस! PSIच्या निधनानंतर मुंबई पोलीस दलात खळबळ

कोरोनाने (Coronavirus) आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेतला आहे.

मुंबई, 12 एप्रिल : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला असून अनेक पोलिसांना या व्हायरसची लागण झाली आहे. रविवारी रात्री उशिरा कोरोनाने (Coronavirus) आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेतला आहे. मोहन दगडे असं निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते 54 वर्षांचे होते. वाकोला पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले मोहन दगडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 4 एप्रिल रोजी मोहन दगडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांना बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटर येथे अ‍ॅडमिट करण्यात आले होते. गेली सात ते आठ दिवस मोहन दगडे यांनी कोरोनाशी झुंज दिली. मध्यंतरी उपचारादरम्यान त्यांची तब्येत सुधारत होती. मात्र गेली दोन दिवस मोहन दगडे यांची प्रकृती अचानकपणे खालावली होती. अखेर काल रात्री उशिरा मोहन दगडे यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन दगडे यांच्या अचानक जाण्याने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पीएसआय मोहन दगडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या कुटुंबावर मोहन दगडे यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा - VIDEO: कुठे बेडची कमी, ventilator खराब तर कुठे रुग्णांना खुर्चीवर दिला जातोय oxygen, राज्यात भयंकर स्थिती खरंतर मोहन दगडे यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास पोलीस दलाबरोबरच समाजाची देखील मोठी हानी होते. कारण हेच ते पोलीस आहेत जे दिवस-रात्र तुमच्या आणि कोरोनाच्या मध्ये एक संरक्षक भिंत म्हणून उभे आहेत. पोलिसांच्या कडक भूमिकेमुळेच अनेक नागरिकांचा कोरोनाची लागण होण्यापासून बचाव होत आहे. पण नागरिकांच्या बेजबाबदार भूमिकेमुळे पोलिसांना दिवस-रात्र ड्युटी करावी लागते. परिणामी पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा एकदा विचार करून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Mumbai News, Mumbai police

पुढील बातम्या