मुंबई, 25 जानेवारी : मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. पण, चोरलेला मोबाईल पोलीस तक्रार करून परत मिळविण्यापेक्षा त्यातील अनेक बाबींचा गैरवापर न व्हावा तसेच दुसरे सीमकार्ड मिळविण्यासाठी सोपस्कार म्हणून केवळ नागरीक मोबाईल हरवल्याची तक्रार करतात. त्यामुळे मोबाईल चोरीकडे अतिशय सामान्य बाब म्हणून पाहिले जाते. पण, वरळी पोलीस स्टेशनच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने गस्तीवर असताना एकट्याने अर्धा तास थरारक पाठलाग करून एका मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्याची घटना बी.डी.डी. चाळ परीसरात घडली आहे. त्यामुळे धाडसी कर्तबगार पोलीस हवालदार रामचंद्र धनाजी महाडिक यांच्यावर पोलीस खाते आणि स्थानिक नागरिकांकडून रोख रकमेच्या बक्षिसांसकट कौतुकाचाही वर्षाव होत आहे.
पोद्दार हॉस्पिटलच्या मागच्या अभ्यास गल्लीत गुरविंदर सिंग नामक एका 61 वर्षीय वृद्ध वाहनचालकाच्या हातावर प्रहार करून एक तरुण मोबाईल हिसकावून पळाल्याची घटना घडली. घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याचे पाहून गस्तीवर असलेले बीटमार्शल हवालदार रामचंद्र धनाजी महाडीक ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात घेऊन, काळा टी-शर्ट, काळी टोपी घातलेला, दूरदर्शन केन्द्राच्या दिशेला पळून गेलेल्या मोबाईल चोराच्या मागावर हवालदार महाडिक निघाले.
हेही वाचा - हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य
चोर स्थानिक असावा, असा कयास बांधून तत्सम वेशभूषा असलेल्या तरूणांना हेरत त्यांनी संपूर्ण बी.डी.डी चाळींच्या गल्ल्या पिंजून काढल्या. त्यावर इमारत क्रं. 29 येथे त्यांना काळी टोपी-काळा टी-शर्ट घातलेला तरूण आरामात चालत असल्याचे आढळले. त्याच्या जवळ जाऊन चौकशीसाठी मार्शल दुचाकी स्टॅण्डवर लावत असताना त्या तरूणाने एका अरूंद गल्लीत जीवाच्या आकांताने धूम ठोकली. त्या गल्लीतून मार्शल दुचाकी जाणार नाही, हे लक्षात आल्याने हवालदार रामचंद्र महाडीकांनी धावत त्याचा माग घ्यायला सुरूवात केली. चोर स्थानिक असल्याने त्याला सर्व वाटा माहीत होत्या, पण हवालदार महाडीकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.
हेही वाचा - तरुणीच्या अकाऊंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि गुरुजींचा घात झाला, बायकोचे दागिनेही मोडावे लागले!
जवळपास वीस मिनिटांचा चोर-पोलिसाचा धावपाठलाग सुरू होता. खाकी वेशातील हवालदार पळताना पाहून काही सजग नागरीकही पळालेल्या चोराची दिशा त्यांना दाखवत होते. अखेर, मोठ्या धाडसाने नालंदा बुद्ध विहार, महिंद्रा हाऊसजवळ हवालदार रामचंद्र महाडिक यांनी त्या मोबाईल चोरावर झडप घातली. एका हातात चोराची गचांडी धरून महाडीक यांनी वॉकीटॉकीवरून पोलीस मदत मागवली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याचे धाडस ऐकून पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हवालदार इनामदार व इंदुलकर यांच्यासह घटनास्थळी तातडीने हजर झाले.
वृद्ध तक्रारदार गुरविंदर सिंग यांनी दाखल तक्रारीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आरोपी कडून हस्तगत केलेला रुपये दहा हजार किमतीचा एम आय कंपनीचा स्मार्टफोन आणि चोराला ओळखले. ड्युटी ऑफीसर पोलीस उपनिरीक्षक खोंडे, सहायक निरीक्षक शितोळे आणि साळुंखे यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी कलम 392अंतर्गत वरळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रमेश दाजिंगे, वय वर्षे 20, या सासमिरा महाविद्यालयात कॉमर्स शाखा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला हा तरूण वरळी बी.डी.डी. चाळीत वास्तव्यास आहे. भौतिक सुख-चैनीसाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी केल्याची कबुली देताना, हा प्रकार पहिल्यांदाच केल्याचा दावा त्याने व त्याच्या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे वरळी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करीत आहे.