विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 26 मे : मुंबईतील बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री दीडच्या सुमारास एका व्यक्तीला चोर समजून स्थानिक लोकांनी बेदम मारहाण केली. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण शांताराम लहाने असं या व्यक्तीचे नाव असून तो 29 वर्षांचा होता. बोरिवली पूर्व कार्टर रोड क्रमांक 5 स्वागत हॉलच्या मागे शशी को.ऑफ.हाऊसिंग सोसायटी समोर हे प्रकरण झालं आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला 25 मे रोजी दुपारी 1.30 वाजता संशयित चोरट्याला अटक करण्याबाबत मिळाली. कलम 304(2), 143, 144, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवून कस्तुरबा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत प्रवीण शांताराम लहाने याचा भाऊ सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रविण त्याच्या पोलीस भावाला न सांगता मुंबईत आला आणि मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. मृत प्रवीण शांताराम लहाने नाशिकचा रहिवासी होता.
प्रवीण शांताराम लहाने हा मद्यधुंद अवस्थेत सोसायटीची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. चौकीदाराने त्याला हटकलं तरीही त्याने आत प्रवेश केला. दारूच्या नशेत असलेल्या प्रवीणला चोर समजून लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीमध्ये प्रविणचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी तपासादरम्यान पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 चौकीदार जोरासिंग जलाराम भट्ट (35), जनक मोतीराम भट्ट (32) आणि 3 सोसायटी सदस्य हर्षित गांधी (27), मनीष गांधी (52), हेमंत रांभिया (54) यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.