मुंबई पोलिसांची झोप उडवणाऱ्या आरोपीला अखेर अटक, भर रस्त्यातच करायचा विकृत कृत्य

मुंबई पोलिसांची झोप उडवणाऱ्या आरोपीला अखेर अटक, भर रस्त्यातच करायचा विकृत कृत्य

या माथेफिरुला अटक करण्यासाठी मुंबई पेलिसांना तब्बल दोन महिने लागले.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : मुंबईत रात्रीच्या वेळी एकट्या असणाऱ्या असलेल्या महिलांच्या पाठीवर आणि समोरून हात मारत अश्लील वर्तण करुन फरार होणाऱ्या एका माथेफिरूला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या माथेफिरुला अटक करण्यासाठी मुंबई पेलिसांना तब्बल दोन महिने लागले.

दुचाकीवरून जात असलेल्या महिलांच्या पाठीवर हात मारून हा माथेफिरू आपल्या दुचाकीवरून पसार होत असे. मुंबई पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून डोळयात तेल घालून कडा पहारा देत होते. विशेष करून रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास मुंबई पोलिसांकरता महत्वाचा काळ असायचा. कारण हा एक असा माथेफिरु होता ज्याने मुंबई पोलिसांची झोप उडवली होती.

रहदारी कमी असलेल्या ठिकाणी एकटी महिला पाहून हा आरोपी हे कृत्य दर 4 ते 5 दिवसांनी करत असे. काही महिलांना तर हा माथेफिरु पाळत ठेवून टार्गेट करुन त्यांच्या सोबत अश्लील कृत्य करत होता. असं करत दिवसाला किमान चार ते सहा महिलांचे विनयभंग करुनच हा माथेफिरु शांत बसायचा. यामुळे महिला तर घाबरल्या होत्याच, पण मुंबई पोलीसही संतापले होते. तर दुसरीकडे आपली बदनामी होऊ नये या भीतीने महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही देत नव्हत्या आणि याचाच फायदा हा माथेफिरु वारंवार घेत होता. पण म्हणतात गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची जागा शेवटी जेलमध्येच असते. या प्रकरणातही तसंच घडलं.

माटुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेबरोबर या माथेफिरूने असंच कृत्य केलं. पण पीडित महिलेने धाडस दाखवलं आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला आणि त्या माथेफिरुचा माग काढायला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली.

हेही वाचा - मुंबई : Gold Loan च्या नावाने सुरू होता Fraud; सोनारही ओळखू शकला नाही बोगस सोनं

पोलिसांना तपासाकरता एक धागा मिळाला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही शोधले. सीसीटीव्हीमध्ये या नराधमाचे सर्व कृत्य कैद झाले होते. सीसीटीव्हीतून पोलिसांना माथेफिरुपर्यंत पोहोचण्यासाठी एक क्लू मिळाला आणि त्यानुसार काही टीम बनवून त्या माथेफिरुचा शोध पोलिसांनी सुरू केला. दादर,माटुंगा,सायन,वडाळा, परळ, या सर्व भागात पोलिसांनी कोपरा ना कोपरा पिंजून काढला. सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली होती. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे आणि माथेफिरु धूम स्टाईल बाईक पळवत असल्याने सीसीटीव्ही मिळून सुद्धा पोलिसांना त्याची काही विशेष मदत झाली नाही.

कितीही अडचणी आल्या तरी पोलिसांनी मात्र त्यांचे शोध कार्य थांबवले नाही आणि एकदिवस पोलिसांना यश आले. त्या माथेफिरुच्या गाडीचा नंबर पोलिसांच्या नजरेस पडला. त्याचा आधार घेत पोलिसांनी आरोपीचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी त्याला कोक्री आगार, सायन या ठिकाणाहून अटक केली. कलम 279,337,354 354 (ड) 134 Motar vehicle act यानुसार या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या महिलांना बरोबर असे प्रकार घडले असतील त्या महिलांनी पुढे येऊन तक्रार देण्यास पोलिसांनी आवाहन केलं आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव, पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस नाईक धर्मेंद्र जुवाटकर या पथकाने हा नराधमाला अटक केली आहे. या कामगिरीबद्दल पोलिसांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 23, 2021, 8:13 PM IST

ताज्या बातम्या