मुंबई, 28 मे : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी रॅगिंग करणाऱ्या एका महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. भक्ती मेहरे असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. अन्य दोन फरार डॉक्टर्सचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानंही गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे.
चार डॉक्टर निलंबित
तसंच याप्रकरणी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Payal Tadvi suicide case: One of the three doctors accused in the case has been detained. More details awaited.
— ANI (@ANI) May 28, 2019
Medical student Payal Tadvi suicide case: National Commission for Women writes to director of BYL Nair Hospital requesting for an investigation and apprise the commission of action taken in the case. pic.twitter.com/CQi9CTWk38
— ANI (@ANI) May 28, 2019
नेमके काय आहे प्रकरण?
वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील ही घटना आहे. पायल तडवी असं आत्महत्या करणाऱ्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरचं नाव आहे. पायल यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचं रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तिघीही जणी फरार झाल्या होत्या.
पाहा :VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण; खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
प्राध्यपकांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
पायल तडवी यांची आई अबेदा तडवी यांनी केलेल्या आरोपानुसार,'रॅगिंगसंदर्भात पायलनं तिच्या प्राध्यापकांकडे तक्रारदेखील केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी पायलनं मला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फोन करून तिचा प्रचंड प्रमाणात मानसिक छळ होत असल्याचं सांगितलं. यापूर्वीही तिनं याबाबतची तक्रार माझ्याकडे केली. तेव्हा मी स्वतः प्राध्यापकांच्या कानावर ही गोष्ट घालत या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली, पण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं. मी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही. अखेर तिनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या'.
पाहा : VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन
अधिष्ठातांनी विभागप्रमुखांना बजावली नोटीस
पायल तडवी या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होती. स्त्रीरोग तज्ज्ञ पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी त्यांनी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. हा उपक्रम 1 मे 2018पासून नायर रुग्णालयाशी संलग्न आहे. यादरम्यान डिसेंबर 2018मध्ये पायल यांनी वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली होती. पायल तडवी यांचे पती डॉ. सलमान यांनीही विभाग प्रमुख डॉ. शिरोडकर यांची भेट घेऊन पत्नीला होणाऱ्याला त्रासाची तक्रार केली. यानंतर दोन महिन्यांसाठी पायल यांचं युनिट बदलण्यात आलं. पण दोन महिन्यांनंतर पूर्वीच्या युनिटमध्ये दाखल झाल्यानंतर मानसिक छळ पुन्हा सुरू झाला, असा आरोप त्यांच्या पतीनं केला.
पाहा :SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?
प्रकरणाचं गांभीर्य पाहता रुग्णालयाचे अधिष्ठातांनी स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. एसडी शिरोडकर आणि पायल यांच्या युनिट प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पायल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केलेली असतानाही योग्य ती कारवाई का केली नाही?याचं उत्तर अधिष्ठातांनी दोघांकडेही मागितलं आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा