मुंबई, 16 मार्च: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार (Mumbai Crime) समोर येत आहे. क्रिकेट (Cricket) खेळण्यास मनाई दिल्याने एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईच्या घाटकोपर परिसरात ही घटना घडली. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाली आहे. यामागे हेच कारण होते की आणखी काही कारणामुळे हत्येचा प्रयत्न झाला, असा सवाल उपस्थित राहतो आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
भारतात क्रिकेटची एक वेगळी क्रेझ आहे, पण हा खेळ खेळासारखा खेळला जातो तोपर्यंतच याची खरी मजा आहे. पण घाटकोपर या ठिकाणी घडलेल्या घटनेने संपूर्ण मर्यादा ओलांडली आहे. याठिकाणी असणाऱ्या कुर्बानशाह दर्ग्याजवळ स्थानिक लोकांच्या घरं आणि दुकानासमोर काहीजणं जबरदस्तीने क्रिकेट खेळायचे. त्यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत असे. स्थानिकांना बॉलने मारही लागला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
(हे वाचा-मेव्हणीने KBC मध्ये जिंकले 50 लाख, पैशांच्या लालसेपोटी पत्नीला दिला तीन तलाक)
दरम्यान रविवारी याच क्रिकेट खेळण्याच्या अट्टहासामुळे घडलेल्या एका घटनेमुळे या किरकोळ वादाने भयंकर स्वरुप घेतले. स्थानिकांनी विरोध केल्यानंतर क्रिकेट खेळणारे आणि स्थानिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. स्थानिकांनी असा आरोप केला आहे की त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
घाटकोपर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या चौकशीच्या आधारे आरोपींविरोदात भादंवि कलम 326, 323, 427, 34, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेतील पीडित तरुणाने अशी माहिती दिली आहे की, रात्रीच्या वेळी या परिसरात लोक हुक्का, दारू, ड्रग्जचं सेवन करतात. त्यांच्या दहशतीमुळे स्थानिकांनीही आजवर याबाबत तक्रार केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Crime, Crime news, Mumbai