मुंबईत वीज तर आली मात्र परिणाम उद्यापर्यंत जाणवणार, नेमकं काय झालं? जाणून घ्या

मुंबईत वीज तर आली मात्र परिणाम उद्यापर्यंत जाणवणार, नेमकं काय झालं? जाणून घ्या

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील बत्ती गुल झाली आणि एकच खळबळ उडाली.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील बत्ती गुल झाली आणि एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर अंशत: परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा आज सकाळी काही तास खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. ज्यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा अंशतः परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. यानुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

ठाण्यासह इतर भागात अद्याप वीज नाहीच!

मुंबई शहरात वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी ठाणे शहर आणि इतर काही भागात वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेक कंपन्यांसह घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही गैरसोय झाली आहे.

दुसरीकडे, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे आज बँकांची कामं देखील होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला.

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, ऊर्जा प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Published by: Akshay Shitole
First published: October 12, 2020, 6:46 PM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या