सत्तेची कोंडी फोडण्यासाठी आता नवा फॉर्म्युला, अशी असेल मंत्रिपदाची वाटणी

सत्तेची कोंडी फोडण्यासाठी आता नवा फॉर्म्युला, अशी असेल मंत्रिपदाची वाटणी

सत्तेची कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून अनेक फॉर्म्युल्यांवर चर्चा होतेय. त्यातच एक नवा तोडगा समोर आलाय.

  • Share this:

नीरज कुमार शर्मा, मुंबई 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापनेसाठी जो पेच निर्माण झालाय तो सोडविण्यासाठी आता सर्व हालचाली दिल्लीत होताहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना भेटल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्तेची कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून अनेक फॉर्म्युल्यांवर चर्चा होतेय. त्यातच एक नवा तोडगा समोर आलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत त्यावर आता अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे. गेली काही दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये अनौपचारिक बैठका होत असून त्यात एका फॉर्म्युल्यावर सगळ्यांचं एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 16-15-12 अशी मंत्रिपदाची वाटणी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेच्या वाट्याला 16, राष्ट्रवादी 15 तर काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं दिली जावू शकतात. एकूण 42 मंत्र्यांना शपथ दिली जावू शकते.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

मुख्यमंत्रिपद हे अडीच वर्ष शिवसेना तर अडीच वर्ष राष्ट्रवादीकडे राहावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतं. शिवसेनेचा त्याला काहीही आक्षेप नाही. तर उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यामुळे ते पद राष्ट्रवादीने मागितलं आहे. मात्र त्यावर अजुन एकमत झालेलं नाही. काँग्रेसही त्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रपक्षांनाही विश्वासात घेण्यासाठी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

VIDEO : सत्ता स्थापनेबाबत सेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा

लवकरच होणार शपथविधी

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. येत्या 4-5 दिवसांत आम्ही सरकार स्थापन करू असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे आमदार अब्दुल सत्ता यांनी सांगितलं की, पक्षाच्या सर्व 56 आमदारांना मुंबईला बोलवण्यात आलं आहे. तसेच सत्ता स्थापनेचं चित्र शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असंही ते म्हणाले.

सत्तार म्हणाले की, सर्व आमदारांची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत. आम्हाला उद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढं आल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही पाठिंब्यासाठी अडचणी येण्याची शक्यता कमी आहे अशी चर्चा रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या