मुंबई, 4 मे: कोरोनाच्या या संकटात (Corona pandemic) कोविड बाधित मातांची प्रसूती (Covid positive pregnant women) कशी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाग्रस्त महिलांची सुखरूप प्रसूती करुन दाखवली आहे. नायर रुग्णालयात (Nair Hospital) आतापर्यंत 1001 कोविड बाधित महिलांची प्रसूती करण्यात आली असून 1022 बळांचा जन्म झालेला आहे.
मुंबई मनपाच्या बा. य. ल. नायर रुग्णालय गेल्यावर्षी म्हणजे. एप्रिल 2020 मध्ये कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर 14 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती कऱण्यात आली. तेव्हापासून साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात 1001 कोविड बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह 19 जुळ्या बाळांचा समावेश असून यानुसार एकूण 1022 बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे.
मुंबई सेंट्रल परिसरात असणा-या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून 24 तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचा-यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे.
कोरोना संकटात मोठा दिलासा; राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेटही अधिक
गेले वर्षभर सातत्याने अविश्रांत मेहनत घेणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागात सुमारे 75 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर प्रसूतिशास्त्र विभागात सुमारे 75 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या 1001 प्रसूतींपैकी 599 प्रसूती या 'नॉर्मल डिलिव्हरी' प्रकारातील होत्या. तर 402 प्रसूती या 'सिझेरियन डिलीवरी' प्रकारातील होत्या.
चिमुकल्यांची कोरोनावर मात
डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले की, कोविडचा संसर्ग हा जन्मतः होत नाही. पोटात असणा-या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) कोविड बाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या तान्हुल्यांपैकी काही नवजात शिशुंची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच 'डिस्चार्ज' देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी 'निगेटिव्ह' आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.