विनय म्हात्रे,(प्रतिनिधी)
नवी मुंबई,20 नोव्हेंबर: महापालिकेचे 300 अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आहेत. बदली होऊनही मलाईदार पद न सोडणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे. महापालिकेच्या कामगार संघटनेने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे.
एसीबीने 300 कर्मचाऱ्यांची चौकशीसाठी महापालिकेकडे यादी मागितली आहे. एसीबीकडून होणाऱ्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये हडकंप उडाला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष विजू पाटील यांनी दिली आहे.
महापालिकेच्या कंत्राटदारांवर छापे
दरम्यान, केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या प्राप्तीकर विभागाने गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले होते. मुंबई व सुरत येथे 44 ठिकाणी तपास व छाप्याची कारवाई करण्यात आली होती. एकूण 37 मोठ्या कंत्राटदारांचा त्यात समावेश आहे. यापुढे आवश्यकता भासल्यास पालिकेतील अधिकारी तसेच पालिका चालविणाऱ्या मोठ्या नेत्यांकडेही चौकशी केली जाईल, असे विभागातील सूत्रांनी सांगितले. यापुढील टप्प्यात आता पालिकेतील अधिकारी व शिवसेनेचे पालिकेशी संबंधित बडे नेते विभागाच्या रडारवर असल्याचेही सांगण्यात आले होते.
राज्यातील सत्तेवरून सध्या भाजप व शिवसेनेचे चांगलेच बिनसले आहे. शिवसेनेने विरोधी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थितीत प्राप्तीकर विभागाने बृहन्मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांना टार्गेट केले आहे. मागील आठवड्यात केलेल्या या कारवाईत कंत्राटदारांकडून तब्बल 735 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. काही कंत्राटदार एकमेकांकडून कर्जरूपात पैसे घेत असल्याचे दाखवत आहेत. तसेच कर्जाच्या रूपात घेतलेल्या या रक्कमेचा अवास्तव व अतिरिक्त खर्च दाखवत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्याआधारेच ही कारवाई करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा