मुंबई, 26 नोव्हेंबर : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कोरोनाच्या संसर्गामुळे बंद ठेवण्यात आली आहे. ही सेवा कधी सुरू होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. याच संदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत पुढचे तीन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून कोरोनाचा वेग आणि नियंत्रण किती आहे यावरून लोकल सुरू कधी करायचा असा निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे.
15 डिसेंबरपासून लोकल सुरू करण्याबाबत बृहन्मुंबई महापालिकेकडून विचार सुरू आहे अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. मात्र या तीन आठवड्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग कसा आहे त्यावर निर्णय ठरेल असंही ते म्हणाले आहेत. मुंबईची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.
हे वाचा-उद्यापासून बदलणार लक्ष्मी विलास बँकेचे नाव, 20 लाख ग्राहकांवर काय होणार परिणाम
मुंबईत सध्या 900 ते 1000 रुग्ण नव्यानं वाढत आहेत. तर 9600 रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. मुंबईतील चाचणीची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली तर महापालिका आणि प्रशासन यंत्रणा देखील सज्ज असल्याचंही पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितलं. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क लावण्यात यावा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन देखील वारंवार प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.