मुंबई, 11 मार्च : मागील तीन आठवड्यांपासून मुंबईत सातत्याने कोरोनाच्या नवीन रुग्णांची (Mumbai Corona Patients) संख्या वाढू लागली आहे. तीन आठवड्यांपूर्वी ही संख्या तीनशेपर्यंत रोडावली होती. परंतु गेल्या काही दिवसांत मुंबईतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा सगळ्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
मुंबईत तर एकाच दिवसात दीड हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या नक्कीच छातीत धडकी भरवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना नियमांचे जास्तीत जास्त पालन करून लॉकडाऊन टाळण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईच्या वरळी परिसरात वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे.
राज ठाकरेंबद्दल महापौर नेमकं काय म्हणाल्या?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी 15 दिवसांपूर्वी वरळीतील पबचे व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात वरळी कोळीवाडा येथे करण्यात आलेल्या शूटिंगचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे आणि सर्व नियम हे सर्वसामान्यांसाठी असतात का? पब आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी कुठले नियम लागू नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला होता.
याच पार्श्वभूमीवर महापौरांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन मग प्रतिक्रिया देईन असं म्हटलं आहे. या सोबतच महापौरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आवाहन केलं आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे : MPSC परीक्षा 14 तारखेला नाहीच; आठवड्याभरात होणार याचं आश्वासन
'आपण हजारो लोकांचे आयडॉल आहात. अनेक लोक आपल्याकडे बघून प्रभावित होतात. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना कृपया मास्कचा वापर करावा. आपण मास्क घालत नसल्यामुळे अनेक जण या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत. आपल्या घरातही वयोवृद्ध मंडळी आहेत. या गोष्टी विचारात घेऊन आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालावा, ही हात जोडून विनंती आहे,' असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.