शिवसेनेनं पुन्हा आयत्यावेळी बदलला उमेदवार; काय झालं पडद्यामागे?

शिवसेनेनं पुन्हा आयत्यावेळी बदलला उमेदवार; काय झालं पडद्यामागे?

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली. पण त्यामागे नेमकं काय आणि कशी चक्र फिरली? आदित्य ठाकरेंचा या निवडीमागे किती मोठी भूमिका होती? मातोश्रीवर नेमकं काय घडलं? शिवसेनेच्या गोटातल्या पडद्यामागच्या घडामोडी...

  • Share this:

प्रणाली कापसे

मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली. पण त्यामागे नेमकं काय आणि कशी चक्र फिरली? आदित्य ठाकरेंचा या निवडीमागे किती मोठी भूमिका होती, अशी सूत्रांची माहिती आहे. पण मातोश्रीवर त्या दिवशी नेमकं काय घडलं, याचा सविस्तर आढावा...

मुंबई महापौरपदाची निवडणूक ही कुठल्याही महापौरांच्या निवडणुकीपेक्षा जास्त चुरशीची ठरते. कारण या महापालिकेत इतके मातब्बर नगरसेवक आहेत की त्यांच्या या पदासाठी खूप चढाओढ असते. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार बदलण्याची जणू शिवसेनेची परंपराच झाली आहे. सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं सगळीच धावपळ होती. त्याआधी शिवसेनेचे जवळपास निश्चित असलेले उमेदवार म्हणून यशवंत जाधव यांचं नाव पुढे येत होतं. पण ते आयत्या वेळी स्थायी समितीच्या बैठकीला आले नाहीत. मातोश्रीवरून आले की ते थेट अर्ज भरायला जातील असं पालिकेतल्या वरिष्ठांनी जाहीरही केलं होतं. पण तसं घडलं नाही.

त्याच वेळी पालिकेतील पक्ष कार्यलयात आधीच उपस्थित असलेल्या  रमाकांत रहाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यामुळे आता रमाकांत रहाटेच अर्ज भरणार असं दिसू लागलं.

वाचा- शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं काही संपलं नाही, दिवाकर रावतेंनी दिले संकेत

अशात अचानक शिवसेना नेते अनिल परब किशोरी पेडणेकर यांना घेवून महापौरांच्या दालनात गेले आणि थोड्या वेळात किशोरी पेडणेकर अर्ज भरतील असं जाहीर करण्यात आलं.

मातोश्रीवर काय घडलं?

महापौरपदाच्या शर्यतीत यशवंत जाधव यांचं नावाची जोरदार चर्चा असल्याने पालिकेतील काही नगरसेवक नाजार होते तर काही खूश. कारण स्थायीची नवी जबाबदारी आपल्याला मिळेल असं काहींना वाटत होतं. त्यापैकी किशोरी पेडणेकरांनी आपला आवाज उठवला आणि सगळी पदं एकट्या जाधवांच्या घरात का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नाराज पेडणेकरांना मातोश्रीने बोलावून घेतले आणि समजूत काढली. त्यामुळे यावेळीही आपला काही मिळणार नाही अशी पेडणेकरांची समजूत झाली. पण आदित्य ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांची पाठराखण केल्याने पेडणेकरांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली.

पेडणेकरच का?

किशोरी पेडणेकर या तीनदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत पण स्थापत्य शहर समिती व्यतिरिक्त कुठलीही मोठी जबाबदारी त्यांना देण्यात असली नव्हती.

वाचा - दिल्लीत जोरदार हालचाली, महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार!

पक्षातील महिला विभाग अध्यक्षपद त्यांच्याकडे असल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीत एक मोठी जबाबदारी त्यांनी पर पाडली. शिवाय आता आदित्य ठाकरे त्या भागातले आमदार प्रतिनिधी आहेत. त्यामुळे या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षांना मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळेच एकीकडे नवे हितशत्रू तयार होऊ नयेत म्हणून आणि शिवाय केलेल्या कामाची शाबासकी म्हणून पेडणेकरांना हे पद देण्यात आलं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

नाराजांची मोठी फळी

महापौरपदासाठी इच्छुकांची कुठल्याच पक्षात कमतरता नसते. अगदी तशीच सेनेतही नाही. त्यामुळे किशोरी पेडणेकरांची बिनविरोध निवड ही अनेकांना खटकणारी आहे. त्यात जुन्या जाणत्या नगरसेवकांचा मोठा भरणा आहे. या पदासाठी इच्छुक असलेले यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर असे बरेच जण होते. यशवंत जाधव महापौर झाले तर आपल्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षाची माळ पडेल असं वाटणाऱ्यांमध्ये विशाल राऊत, श्रद्धा जाधव हे ही आता नाराज आहेत. येत्या काळात या नाराजांची मनं वळविण्याचं मोठं काम पक्षाला करावं लागणार आहे.

----------------------

अन्य बातम्या

VIDEO : जेसीबीनं बैलाला चिरडणारे अखेर सापडले, इथं घडली क्रूर घटना

सोशल मीडियावर बाबा रामदेवांविरोधात भडका, आनंदराज आंबेडकरांनीही ठणकावलं

Reliance Jio चे दर ठरणार ट्रायच्या नियमांनुसारच, कंपनीचं स्पष्टीकरण

शिवसेनेचे कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 19, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading