मुंबई, 12 जानेवारी : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मुंबईची लाईफलाइन असलेली मुंबईची लोकल कधी सुरू होणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे. लवकरच लोकल सुरू करण्याची शक्यता आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून चेन्नई पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे.
मुंबईची लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी प्रवाशी संघटनेकडून होत आहे. पण, लोकलमधील गर्दीला आळा कसा घालायचा असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. पण यावर तोडगा म्हणून राज्य सरकारकडून चेन्नई पॅटर्न वापरण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीच्या वेळा वगळता प्रवास करण्यास परवानी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईमध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा म्हणून ठरावीक प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात महिलांना गर्दी नसलेल्या वेळेत प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. तर त्यानंतर गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य लोकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
त्यामुळे गर्दीने कायम ओसांडून वाहणाऱ्या मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासाठी चेन्नई पॅटर्न वापरण्याची शक्यता आहे. मुंबई लोकलमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून ठरावी वर्गाला परवानगी देण्यात आली आहे. तसंच महिलांना सुद्धा प्रवास करण्यास आधीच मुभा दिली आहे.
परंतु, मुंबईत कार्यालयांच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जरी गर्दीच्या वेळी परवानगी देण्याचे ठरले तर गर्दी होणे हे अटळ आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.