लोकल नियमित सुरू करणं तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाही; काय असेल सुवर्णमध्य? वाचा Exclusive Report

लोकल नियमित सुरू करणं तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाही; काय असेल सुवर्णमध्य? वाचा Exclusive Report

मुंबईची लोकल (Mumbai Local) सर्व सामान्यांसाठी सुरू करणं आव्हानात्मक आहे. पण आमचे प्रयत्न सुरू आहेत. असं मत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: कोरोना (Corona)च्या काळात मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल सामान्य माणसांसाठी अनेक महिन्यांपासून बंद आहे. आयएएस अधिकारी आणि महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. कार्यालयांच्या वेळा, गर्दीचं नियोजन, सॅनिटायजेशन या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मुंबईतील लोकल सामान्यांसाठी सुरू करता येणं शक्य आहे, असं ते म्हणाले. लोकांचे जीव वाचवणं याला प्रशासनाचं प्राधान्य आहे, परंतु उदरनिर्वाह करण्यासाठी घराबाहेर पडणं नागरिकांची गरज आहे. निंबाळकर यांनी व्यक्त केलं. सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचं पत्र बुधवारी 28 ऑक्टोबरला लिहिलं आहे. निबांळकर यांनी मुलाखतीमध्ये काय मतं व्यक्त केली आहेत जाणून घेऊया.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून 3 दिवस झाले आहेत. त्यांचा प्रतिसाद आला आहे का?

हो. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पत्राला प्रतिसाद दिला आहे. लोकल ट्रेन सुरु केल्यावर गर्दीचं व्यवस्थापन कसं करणार या विषयावर त्यांनी एक बैठक घ्यायला सांगितली आहे.

काही दिवसांपूर्वी लोकल रेल्वेमधील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सुरु नाही, तरीदेखील इतकी गर्दी होत आहे. मग सर्वांसाठी लोकल रेल्वे सुरु केल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य होईल का?  

आमच्या प्रस्तावानुसार सध्या अत्यावश्यक सेवांतील लोक सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात लोकलने प्रवास करू शकतील. उरलेल्या वेळात कमी गर्दी राहील यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. त्यामुळे कार्यालयीन वेळांचे विभाजन केल्यास हे शक्य होणार आहे. सकाळी लवकर, दुपारी आणि संध्याकाळी उशिरा या वेळांत सामान्यांनी प्रवास केल्यास गर्दीचं व्यवस्थापन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल.

केवळ मुंबई शहरासमोर असणारी मुख्य आव्हानं कोणती?

मुंबई शहर हे भारतातील इतर शहरांच्या तुलनेत मोठं शहर आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत इथली लोकल सेवा सुरु करणं जास्त आव्हानात्मक आहे. सामान्य परिस्थितीत मुंबईमध्ये एका लोकलमधून 750 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. पण गर्दीच्या वेळी 4500 जण प्रवास करतात. त्यामुळे जर कोरोनापूर्वीच्या पद्धतीने लोकं लोकलने प्रवास करायला लागले तर मोठ्या गंभीर अडचणींना सामोरं जावं लागेल. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन मुख्यमंत्री योग्य त्या सूचना देतील.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सॅनिटायझेशनच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

सध्या दररोज लोकल ट्रेन सॅनिटाइझ केल्या जात आहे. लोकल ट्रेन सॅनिटाइझ करणं हे किती मोठं काम आहे हे लक्षात घेतलं तर प्रत्येक फेरीनंतर लोकल ट्रेनचं सॅनिटायजेशन करणं शक्य नाही. परंतु दररोज हे काम केलं जात आहे.

कोलकत्ता मेट्रोसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या फर्मचा सल्ला राज्य सरकारने घेतल्याचं एका बातमीत म्हटलं होतं. या फर्मने केलेल्या सूचनांबद्दल काही सांगू शकाल का?

सध्या आम्ही या फर्मसोबत काम करत आहोत त्यांना हवा असणारा डेटा आम्ही दिला आहे. त्याबद्दल अधिक पक्की माहिती मिळेल आणि ती माध्यमांना सांगता येण्यासारखी असेल तर ती आम्ही नक्कीच देऊ.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या