दिवसभराच्या 'बंद'नंतर मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर

दिवसभराच्या 'बंद'नंतर  मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर

दादर, ठाणे, कल्याण इथे रेलरोको करण्यात आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती

  • Share this:

 मुंबई, 03 जानेवारी : दलित संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदाचे पडसाद मुंबईच्या लोकलवरही उमटले. बंदामुळे बऱ्याच वेळासाठी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल थांबली होती. तिन्ही मार्गांवरची लोकलसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तरी आता महाराष्ट्र बंद मागे घेतल्यामुळे वाहतूक पुन्हा पुर्वपदावर येते आहे.

कोरेगाव भीमा इथे झालेल्या  दगडफेकीच्या  निषेधार्थ   भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आज  मुंबईत ठिकठिकाणी रेलरोको  करण्यात आलं. दादर, ठाणे, कल्याण इथे रेलरोको करण्यात आल्यामुळे  मध्य रेल्वेची वाहतूक  पूर्णपणे ठप्प झाली होती. अशावेळी रेल्वे प्रशासनाकडून  विशेष गाड्या सोडल्या जात होत्या. या गाड्याही रस्त्यात बंद पडत होत्या.  लोकल मिळत नाही म्हणून अनेक लोक डोंबिवलीपासून  ठाणे स्टेशनपर्यंत रूळांवरून चालत  आले. तर दुसरीकडे हार्बरची वाहतूक ही विस्कळीत झाली होती. अनेक लोकल तासभर  उशिराने धावत  होत्या.  बराच वेळ लोकल न मिळाल्याने विशेष लोकल गाड्या भरगच्च भरल्या होत्या. काही वृद्धांना अखेर महिलांच्या डब्यातूनही प्रवास करायची पाळी आली होती.

साधारण चारपर्यंत बंदचा परिणाम मध्य आणि हार्बर रेल्वेवर जाणवत होता.असं जरी असलं तरी  मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक  धिम्या गतीने सुरू  होती.  मुंबईकडे  चेन्नई  आणि इतर ठिकाणहून  आलेल्या एक्सप्रेस गाड्या थांबत थांबत का होईना पण आगेकूच करत होत्या. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी या गाड्यांचा मार्ग स्वीकारला होता.

चार  वाजताच्या सुमारास  महाराष्ट्र बंदचा हाक मागे घेण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती मिळते आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 04:46 PM IST

ताज्या बातम्या