मुंबई, 22 ऑक्टोबर : मुंबई आणि उपनगरातील मगिलांना दिलासा देणारा निर्णय अखेर बुधवारपासून अंमलात आला होता. Coronavirus च्या साथीमुळे lockdown लागला आणि जवळपास 7 महिन्यांनंतर लोकल प्रवास सर्व महिलांसाठी खुला करण्यात आला. पहिल्या दिवशी अत्यंत शिस्तबद्ध कारभार, रांगेतून प्रवेश, सोशल डिस्टन्सिंग असं सगळं पाळून मोजक्याच महिलांनी लोकलने प्रवास केल्याचं चित्र दिसलं. मात्र गुरुवारच्या दुसऱ्याच दिवशी उपनगरातल्या रेल्वे स्टेशनवर काय परिस्थिती होती पाहा...
लोकलसेवा पूर्ववत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून मुंबईकर करत आहेत. पण Covid-19 चा धोका अजून टळलेला नसल्याने राज्य सरकारने सर्वांसाठी लोकलला अद्याप परवानगी दिली नाही. लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचाच विचार आहे. त्यानुसार आतापर्यंत फक्त सरकारी कर्मचारी आणि आवश्यक सेवांतल्या नागरिकांसाठी QR कोड स्कॅन करून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येत होती. मोजक्या लोकलच धावत आहेत. पण बुधवारपासून सर्व महिलांसाठी लोकल प्रवासाला परवानगी मिळाली.
पहिल्या दिवशी लोकलमध्ये महिला प्रवाशांची फारशी गर्दी दिसली नाही. पण अंदाज घेऊन दुसऱ्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणावर महिला प्रवाशांनी लोकलने जायला प्राधान्य दिल्याचं दिसतं. दिवा रेल्वे स्थानकाबाहेर तिकीट खिडकीपासून पार लांबपर्यंत महिला प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रांग लागली होती.
महिला प्रवाशांना लोकलनं प्रवास करायची परवानगी मिळाल्यानंतर दिवा स्थानकाबाहेरची दुसऱ्या दिवशीची दृश्यं
जहां तक नजर जाए... बस देखते रहिए. #मुंबई में सभी महिलाओं के लिए लोकल से यात्रा करने की अनुमति मिलने के बाद दूसरे दिन दिवा रेलवे स्टेशन के दृश्य#Mumbai @swati_lokhande pic.twitter.com/dJaPPUKzCj
— Manoj Khandekar (@manojkhandekar) October 22, 2020
महिला प्रवाशांची संख्या मोठी असली तरी रांगेनेच प्रवेश दिला जात होता. मात्र एवढी गर्दी डब्यात झाली तर सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार हा मात्र प्रश्नच आहे.
वकिलांसाठीही लोकल
महिलांनंतर आता मुंबईत वकीलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र हा निर्णय हा प्रायोगिक तत्वावर असून त्यांनाही वेळेचं बंधन असणार आहे. सकाळी लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवासास मुभा देण्यात आली आहे.
गर्दीच्या वेळी वकीलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही. प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळी तिकीटं काढावी लागणार आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अधिकृत ओळखपत्रावरच तिकीट मिळणार आहेत. अधिकृत कामासाठीच प्रवास करता येणार, खाजगी कामासाठी प्रवास करता येणार नाही अशीही अटक घालण्यात आली आहे.