धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी बेतली जीवावर, पाहा 20 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी बेतली जीवावर, पाहा 20 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO

धावत्या लोकलमध्ये हुल्लडबाजी, 20 वर्षीय तरुणाचा स्टंट करताना मृत्यू

  • Share this:

अजित मांढरे (प्रतिनिधी)ठाणे, 30 डिसेंबर: रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी केली जाते. असेच लोकलच्या दारावर उभं राहुन माकडचाळे करणं कल्याणच्या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. लोकलच्या दारात माकडासारखे स्टंट करत असताना तरुणाचा अपघात झाला आणि तरुण लोकलमध्ये उलटा फेकला गेला. ही दुर्घटना दिवा ते मुंब्रा दरम्यान घडली आहे. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दिलशाद नौशाद खान असं मृत्यू झालेल्या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे.

दिलशाद आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गोवंडीला कपडे विकत घ्यायला गेला होता. कपड्यांची खरेदी करून घरी परत जात असताना लोकलमध्ये फारशी गर्दी नाही असं पाहून दिलशाद दारात उभा राहिला. काही वेळानंतर त्याने दरवाज्याला लटकून स्टंट करण्यास सुरूवात केली. सुरुवातील लोकलच्या दारात आणि नंतर दाराला धरून लोकलबाहेर स्टंट सुरू झाले आणि हाच स्टंट जीवघेणा ठरला. दरम्यान दिलशादचा मित्र त्याचे स्टंटबाजीचे व्हिडिओ काढत होता. काही कळण्याआतच दिलशाद दिवा ते मुंब्रा दरम्यान एका खांबाला धडकला आणि खाली कोसळला. दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

वारंवार रेल्वे प्रशासनाकडून धावत्या लोकलमध्ये चढू नये, स्टंट करू नये असं आवाहन केलं जातं. मात्र हुल्लडबाज तरुण लोकलमध्ये जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात. अशा तरुणांवर पोलिसांकडून ठोस कारवाई कधी केली जाणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.

अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करू नका. हे स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना न्यूज 18 लोकमतकडून आवाहन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 01:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading