मुंबई, 24 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनाच्या व्हायरसपासून मुक्त झाले आहेत.
या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच या व्हायरसची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
चीनच्या वुहान प्रांतातील कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात या व्हायरसचे 101 तर मुंबई परिसरात 56 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा आणि इतर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 17 आणि 21 मार्चला कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन ते तीन कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यानंतरही गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने सरकारने अखेर संचारबंदी लागू केली आहे.
हेही वाचा-FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो?
राज्यात एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 12 रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या 12 रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.