मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत तरुणाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने किडनी काढली? धक्कादायक VIDEO व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने केला खुलासा

मुंबईत तरुणाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने किडनी काढली? धक्कादायक VIDEO व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने केला खुलासा

एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.

एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.

एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 21 ऑगस्ट : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका रुग्णालयामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचे मूत्रपिंड काढण्यात आले, या कारणाने मृत रुग्णाचे नातेवाईक रोष व्यक्त करत आहेत, अशा आशयाची दृकश्राव्य चित्रफित समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे. कूपर रुग्णालयासह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC) सदर आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. हे आरोप निव्वळ खोटे, खोडसाळपणाचे तसेच कपोलकल्पित असून जाणूनबुजून रुग्णालयाची व महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहेत. संबंधित दृकश्राव्य चित्रफित महिनाभरापूर्वीची असून त्यावेळीदेखील प्रशासनाने योग्य तो खुलासा केला होता, असं स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. काय आहे रुग्णालयाचं म्हणणं? रविवार, 19 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास कूपर रुग्णालयात अंदाजे 30 वर्ष वयाच्या तरुणाला उपचारार्थ आणण्यात आले. यावेळी सदर तरुणाच्या मुखावाटे रक्त बाहेर पडत असल्याची आरोग्यविषयक तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली होती. रुग्णालयात उपस्थित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱयांनी या रुग्णाची तत्काळ तपासणी केली तसेच क्ष-किरण तपासणी करुन तातडीने उपचार सुरु केले. मात्र, काही वेळातच म्हणजे रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू ओढवला. क्ष-किरण परीक्षण व वैद्यकीय निरीक्षणानुसार सदर रुग्णास तीव्र स्वरुपाच्या न्यूमोनियाची लागण झालेली होती, असे लक्षात आले. कोविड १९ विषाणू संसर्गाच्या काही लक्षणांशी न्यूमोनिया आजारातील काही लक्षणांचे साम्य आहे. तसेच कोविड 19संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेता, रुग्णाच्या मृत्यूचे कारण नोंदवताना तीव्र न्यूमोनिया सह कोविड 19 बाधा संशय हे कारण नोंदवण्यात आले. संबंधित रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरी नेण्याची या नातेवाईकांची मागणी होती. मात्र, मृत्यूच्या कारणाची नोंद पाहून मृतदेह घरी नेण्यास परवानगी नसल्याने संबंधित मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनावर आरोप केला. रुग्णालय प्रशासनाने नियमानुसार, सदर मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द केला. कोविड 19 संसर्गाच्या अनुषंगाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्र व राज्य सरकार यासह विविध सक्षम प्राधिकारी यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱया निर्देशांना अनुसरुनच सर्व वैद्यकीय पद्धती (मेडिकल प्रोटोकॉल) पाळले जातात. मृत्युंच्या कारणांची नोंद करताना देखील त्याचे काटेकोर पालन केले जाते. त्यामुळे संशयित कोविड 19 बाधा हे कारणदेखील त्यास अनुसरुनच नोंदवण्यात आले होते. त्यासाठी संबंधित डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासन यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच रुग्णालयाकडून तातडीने व योग्य असेच उपचार रुग्णाला पुरवण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नव्हता. सदर रुग्णाच्या मृत्युनंतर त्यांचे नातेवाईक रोष व्यक्त करित असल्याची दृकश्राव्य चित्रफित त्यावेळीदेखील प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे यांतून प्रसारित होत होती. त्यावर महानगरपालिका प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक खुलासा देखील दिनांक 21 जुलै 2020 रोजी प्रसारित केला होता. सुमारे महिनाभरानंतर पुन्हा तीच जुनी दृकश्राव्य चित्रफित प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून प्रसारित करुन त्यासोबत नवीन आरोप करण्यात येत आहेत. संबंधित रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याने त्याचे नातेवाईक रोष करित असल्याचे हे कथित आरोप आहेत. म्हणून, कूपर रुग्णालयासह महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्‍ट करण्यात येते की, सदर रुग्णाचे मूत्रपिंड काढण्यात आल्याचे आरोप धादांत खोटे व खोडसाळपणाचे आहेत. कारण, सदर रुग्णाच्या मृत्यूचे नोंदवलेले कोविड बाधा हे कारण लक्षात घेता शवविच्छेदन करण्यात आले नाही. साथरोग अधिनियम 1897च्या अनुषंगाने सदर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनच करण्यात आले नसल्याने रुग्णाची किडनी काढल्याचा आरोप खोटा आहे, हे आपसूकच सिद्ध होते. सबब, यासंदर्भात रुग्णालय प्रशासनावर करण्यात येत असलेले आरोप हे दुर्दैवी असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. कूपर रुग्णालयाची व महानगरपालिका प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणुनबुजून तसे आरोप करण्यात येत आहेत. त्यासाठी जुन्या चित्रफितीचा उपयोग करुन खोडसाळ प्रकार केले जात आहेत, असे प्रशासनाचे स्पष्ट मत आहे. जनतेने अश्या खोडसाळ व खोट्या दृकश्राव्य चित्रफितींवर विश्वास ठेवू नये तसेच त्या अग्रेषित (फॉरवर्ड) करु नयेत, असे नम्र आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
First published:

पुढील बातम्या