Home /News /mumbai /

छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान प्रकरण, गुणरत्न सदावर्तेंना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा

छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान प्रकरण, गुणरत्न सदावर्तेंना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्तेंचा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मुंबई, 26 एप्रिल : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्तेंचा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आक्षेपार्ह वक्तव्य करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुण्याच्या विद्यापीठ पोलिसांनी कालच आर्थर रोड जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याविरोधात सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्तेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना पुण्याच्या प्रकरणातून अटक होणार नाही. मात्र इतर प्रकरणात ते कोठडीत असतील. त्या प्रकरणांमधून त्यांना जामीन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावं लागेल. गुणरत्न सदावर्ते यांनी 'न्यूज 18 लोकमत'च्या एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या विधानावरुन त्यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या हिंसक आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणं आणि सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपांखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचं प्रकरण समोर आलं. यानंतर सदावर्तेंवर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करुन खोटे आश्वासन देवून पैसे वसूल केल्याच्या आरोपांप्रकरणे राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Mumbai Police आयुक्तांवर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटून तक्रार करणार) पुण्याच्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा ताबा घेण्यासाठी विद्यापीठ पोलीस मुंबईत आले होते. त्यांनी आर्थर रोड जेल प्रशसनाकडे ताबा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याविरोधात सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. कोर्टात सरकारी वकील अरुणा पै यांनी बाजू मांडली. सदावर्ते यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुन्हा तसं वक्तव्य करतील, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या सुनावणी दरम्यान पुणे विद्यापीठ पोलीसही कोर्टात दाखल झाले होते. पण कोर्टाने सदावर्ते यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी कोर्टाने सदावर्तेंना आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश दिला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Mumbai high court

पुढील बातम्या