मतदानावर पावसाचे सावट..सह्याद्रीच्या पूर्व- पश्चिम उतारावर मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातून मान्सूनची 'एक्झिट' झाली असली तरी मान्सूनेत्तर पावसाची पुन्हा एकदा रिपरिप सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 06:00 PM IST

मतदानावर पावसाचे सावट..सह्याद्रीच्या पूर्व- पश्चिम उतारावर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई,20 ऑक्टोबर:महाराष्ट्रातून मान्सूनची 'एक्झिट' झाली असली तरी मान्सूनेत्तर पावसाची पुन्हा एकदा रिपरिप सुरू झाली आहे. मुंबईसह उपनगरासह संपूर्ण राज्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. तसेच उद्या, सोमवारी सह्याद्रीच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्रात उद्या (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या राज्यभरात मतांचा पाऊस पडणार की, मुसळधार पाऊस पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विजांच्या गडगडाटासह मुसळधार

दरम्यान, कोल्हापूरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे सायंकाळी 5 वाजताच जिल्ह्यात सर्वत्र अंधाराचा साम्राज्य पसरले आहे. बंगळुरू महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. निपाणी, बेळगाव, चंदगड, पन्हाळा, आंबा, तिलारी भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. उद्याच्या मतदानावर मुसळधार पावसाचे सावट आहे. त्यामुळे नेतेमंडळी चिंतेत आहेत. कापलेल्या भात पिकांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पवसाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रात 23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पवसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी असतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Loading...

पुण्यात दोन दिवसांपासून पाऊस...

पुण्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पुण्यातील काही भागात चांगला पाऊस होतोय. शनिवारी रात्रीही पुण्यात पाऊस झाला. मतदानाच्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला.

उत्तर महाराष्ट्रात चाळीसगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने कापूस ज्वारी बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच आदर्श जयहिंद कॉलनीतील रस्त्यांवर दोन फुटापेक्षा जास्त पाणी सध्या साचले होते. मनमाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला परिसरातही पावसानं दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीवर आलेले मका, बाजरीसह इतर पिकांना फटका बसणार आहे.

दुसरीकडे, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका भात शेतीला बसला. तालुक्यातील शेकडो हेक्टरमधील भाताची शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीची शासनाकडून भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तर उद्यापर्यंत जिल्ह्यात असाच पाउस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून सलग 15 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

VIDEO:परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...