नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : मुंबईतल्या चाळी आणि इमारतींमध्ये एकूण 10 घरं, उत्तर प्रदेशात पाच एकर शेतजमीन, त्याशिवाय दीड किलो सोनं, दोन एसयूव्ही कार, एक मोटारसायकल...ही एवढी संपत्ती मुंबईतल्या एका फेरीवाल्याची (Hawker) आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशातल्या (UP) सुलतानपूरमधून (Sultanpur) 2005 साली मुंबईत येऊन दादर रेल्वे स्टेशनवर शेव्हिंग ब्लेड्सची विक्री करण्याचा छोटा व्यवसाय संतोषकुमार सिंह (Santosh kumar Singh) ऊर्फ बबलू ठाकूर या फेरीवाल्याने सुरू केला होता. पण काही गुन्हेगारांच्या संपर्कात येऊन त्याने खंडणीखोरी आत्मसात केली, आपल्यासाठी खंडणी (Extortion) गोळा करणाऱ्यांचं जाळंच त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण (Kalyan) या रेल्वे स्टेशन्सदरम्यान विणलं आणि तो करोडपती बनला.
त्याच्या खंडणीखोरीबद्दल आलेल्या तक्रारीवरून त्याच्यासह त्याची पत्नी आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्या एकूण आठ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातून अनेक जण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात, त्याप्रमाणे 2005 साली संतोषकुमार मुंबईत दाखल झाला. फेरीवाला बनायचं त्याने ठरवलं आणि दादर रेल्वे स्टेशनच्या पुलावर उभा राहून तो शेव्हिंग ब्लेड्सची विक्री करू लागला. व्यवसाय करता करता त्याची काही गुन्हेगार आणि खंडणीखोरांशी गाठ पडली. त्यांच्याकडून तो खंडणीखोरी शिकला. ज्यांच्यावर हाणामारीचे गुन्हे (Body Offences) दाखल आहेत, अशा गुंडांना त्याने हाताशी धरायला सुरुवात केली. त्यांना दारूचं आमिष दाखवून त्यांचा त्याने खंडणी गोळा करण्यासाठी वापर करून घ्यायला सुरुवात केली. त्यातून त्याचं रॅकेट (Racket) तयार झालं.
रेल्वे स्टेशनच्या कोणत्याही पुलावर उभं राहायचं असेल, तर फेरीवाल्यांना संतोषकुमार किंवा त्याच्या गुंडांकडे दर दिवशी प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी द्यायला लागायची. एका फेरीवाल्याकडून दररोज किमान पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतची खंडणी संतोषची गँग वसूल करायची, अशी माहिती दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली.
संतोषकुमार काही वर्षांतच लाखो रुपये कमाई करू लागला. आपल्याकडे काम करणाऱ्या गुंडांना पोसूनही त्याच्याकडे बरीच रक्कम उरत होती, ती त्याने गुंतवायला सुरुवात केली. 2010 पर्यंत तो आणि कुटुंबीय रेल्वेने आपल्या मूळ गावी जात. 2010 पासून हे कुटुंब विमानानेच प्रवास करू लागलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून कल्याणपर्यंतच्या महत्त्वाच्या स्टेशन्सवर त्याने रीतसर आपलं खंडणीचं रॅकेट तयार केलं. खंडणीतून मिळालेले पैसे तो मालमत्तेमध्ये (Properties) गुंतवू लागला.
उत्तर प्रदेशात सुलतानपूरमध्ये त्याने पाच एकर शेतजमीन खरेदी केली. तसंच, दादर, परळ, कल्याण, तुर्भे अशा ठिकाणी चाळी आणि बिल्डिंगमध्ये संतोषकुमार आणि त्याची पत्नी रिटा हिच्या नावावर 10 फ्लॅट्स असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. कागदावर त्यांची किंमत पाच कोटी रुपये असली, तरी बाजारभावाने संतोषकुमारच्या मालमत्तांचं मूल्य 10 कोटी रुपये आहे. साधारणतः ज्या चाळींचा पुनर्विकास (Redevelopment) होत आहे, त्या चाळींमध्ये संतोषकुमारने घरं घेतली. त्यामुळे पुनर्विकासाच्या वेळी चांगला फायदा होऊ शकेल, असा त्याचा उद्देश होता, अशी माहिती काटकर यांनी दिली.
त्याच्या नावावर 30 पेक्षा जास्त सेव्हिंग्ज अकाउंट्स असल्याचं आणि त्यात 12 लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याचं पोलिसांना आढळलं. ही खाती गोठवण्यात आली आहेत. बहुतांश खाती क्रेडिट सोसायटीज आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये होती. क्रेडिट सोसायटीच्या खात्यात त्याच्याकडून दररोज पैसे भरले जात. मालमत्ता घेण्यासाठी तो क्रेडिट सोसायट्यांकडूनच कर्ज घेई. महिन्याभरातच त्या कर्जाची परतफेड करून टाकत होता. पैशांची फिरवाफिरवी करण्यासाठी 30 हून अधिक खाती उघडण्यात आली होती.
संतोषकुमार सिंहसह विजय भुतेकर, पंकेश भोसले हे गुंड फेरीवाल्यांना धमकावत, तर लता पवार खंडणी वसूल करण्याचं काम करत असे. खंडणीची रक्कम संतोषकुमारच्या पत्नीच्या नावे ठेवली जात असे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तावडीतून बचावण्यासाठी संतोषकुमार आपले साथीदार वारंवार बदलायचा, असंही पोलिसांनी सांगितलं.
2006 मध्ये पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. तेव्हापासून 25 हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यात खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न आदी आरोपांचा समावेश आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याबद्दल त्याला आठ महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. अनेक वेळा त्याला पकडूनही जामिनावर त्याची सहज सुटका होत होती. पोलिसांकडून कारवाई होऊनसुद्धा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण या रेल्वे स्टेशनवर त्याची गुन्हेगारी सुरूच होती.
या वर्षी मे महिन्यात पोलिसांनी त्याचा पाठलाग करत पकडलं. गोवंडीपासून त्याचा पाठलाग करता करता ठाणे टोल नाक्यावर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. आता त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याने त्याची सुटका अवघड आहे. त्याचाही कोणी मास्टरमाइंड आहे का, हे तपासण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai