मुंबई: खैरानी रोडच्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

मुंबई: खैरानी रोडच्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

आगीत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई,28 डिसेंबर:साकीनाका येथील खैरानी रोडवरील औद्योगिक गाळ्याला शुक्रवारी सायंकाळी लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आरती लालजी जयस्वाल (वय-25), पीयूष पिताडिया (वय-42) अशी मृतांची नावे आहेत. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना आढळून आले. एक जण बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 30 ते 35 गोदामे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, साकीनाका येथे केमिकलचे गाळे, लाकडाचे कारखाने दाटीवाटीने असल्याने ही आग क्षणात भडकली आणि जवळच असलेल्या झोपड्यांपर्यंत पसरली.

लेव्हल फोरची ही आग असल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. विझवण्यासाठी 11 गाड्या, 12 वॉटर टॅंकर, फ्यूम टेंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग पसरून नये म्हणून सतत पाण्याचा मारा सुरू आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

आगीचा विमानसेवेला फटका

खैरानी रोड परिसरात एका गोडाऊनला भीषण आग लागली. नंतर ही आग पसरत जाऊन 30 ते 35 गोदामे जळून खाक झाली. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले. त्यामुळे रस्ते वाहतुकीसह विमानसेवेवरही त्याचा परिणाम झाला. काळ्याकुट्ट धुराचे लोट अंधेरी, घाटकोपर परिसरापासून विमानतळापर्यंत पोहोचले. यामुळे विमानांची उड्डाणे सुमारे 20 ते 25 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 28, 2019, 8:38 AM IST

ताज्या बातम्या