मुंबई, 27 डिसेंबर : कुर्ला परिसरातून रविवारी सकाळीच एक मोठी बातमी येत आहे. मुंबईच्या कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात भीषण आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील अतिशय मोठा आसा हा मॉल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे वाचा-ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमुळे चिंता, 16 जणांना नव्या विषाणूची लागण झाली?
दुसरीकडे भिवंडी शहरातील झेंडानाका इथं एका भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत गोडाऊनमधील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गजबजलेल्या वस्तीत या दोन मजली इमारती मध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागताच पहिल्या मजल्यावरील आणि शेजारील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही तर परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.