मुंबई, 19 एप्रिल : मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच (Coronavirus in Mumbai) दुसऱ्या लाटेनंही थैमान (Coronavirus second wave) घातलं. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत गेली. पण आता ज्याप्रमाणे मुंबईने पहिल्या लाटेला थोपवलं तसंच आता दुसऱ्या लाटेलाही मुंबई थोपवणारच अशी आशा निर्माण झाली आहे आणि याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी. मुंबईतील कोरोनाची आकडेवारी चांगले असे संकेत देत आहेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं हे चित्र आहे.
मुंबईतील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या 9 हजारच्या पार गेली होती. पण आता ही संख्या 8 हजारच्या खाली आहे. दररोज नवे कोरोना रुग्ण कमी जास्त होत आहेत. पण गेले चार दिवस ही संख्या 8000 ते 8500 च्या दरम्यानच आहे. त्यामुळे फार मोठी तफावत रोज दिसून येत नाही आहे. गेले तीन दिवस तर रुग्णसंख्या कमी होतानाच दिसते आहे. त्यामुळे मुंबईसाठी हे खूप दिलासादायक असं चित्र आहे.
मुंबईतील गेल्या 9 दिवसांतील नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास
दिनांक - नवे बाधित रुग्ण
18 एप्रिल - 8479
17 एप्रिल - 8834
16 एप्रिल - 8839
15 एप्रिल--8217
14 एप्रिल - 9925
13 एप्रिल - 7898
12 एप्रिल - 6905
11 एप्रिल - 9989
10एप्रिल - 9327
हे वाचा - Remdesivir स्वस्त झालं पण...; औषधाबाबत AIIMS ने दिली मोठी माहिती
एकेकाळी सर्वात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईच्या के पूर्व विभागातील कोरोना रुग्णाची संख्या स्थिरावत चालली आहे. रुग्णसंख्या दुपटीचे दिवस वाढले असून हे मुंबईसाठी एक चांगले संकेत आहेत. अशी माहिती या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर उर्मिला पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावल्याचं दिसतं आहे. जर ही स्थिती अशीच राहिली तर मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट कमी होण्याची शक्यता आहे. पण पुढील आठवड्यातच हे आपण ठोसपणे सांगू शकतो, असं मुंबईचे अतिरिक्त आयुक्त म्हणाले.
हे वाचा - राज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर
18 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 5,79,311 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4,78,039 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 87,698 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 82% टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी आता 45 दिवस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai