मुंबई, 20 मार्च : पश्चिम रेल्वेवर लवकरच लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या हॉल्टवर पुनर्विचार केला जाणार आहे. यासाठी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात येणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या विद्युतीकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळे ट्रेनचा स्पीड वाढला आहे. या बदलामुळे ट्रेनच्या हॉल्टमध्ये सुधारणेची प्रक्रिया पार पडणार आहे. दोन स्थानकांमधलं अंतर कमी असेल तर एका स्टेशनवरचा हॉल्ट रद्द करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायलट प्रोजेक्ट म्हणून 5-6 ट्रेनना निवडण्यात आलं आहे, ज्या मुंबई ते दिल्ली आणि गुजरातदरम्यान जातात. या ट्रेन वांद्रे टर्मिनसहून निघतात आणि बोरिवलीला थांबतात. या ट्रेनच्या हॉल्टला दादर, अंधेरी, बोरिवली, वसई आणि बोईसर किंवा पालघर यांच्यात विभागलं जाईल.
बोरिवलीवर वाढलं ओझं
उत्तर मुंबईच्या दिशेने नागरिकांचं स्थलांतर झालं आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढणारी आणि उतरणारी गर्दी याच स्टेशनवर होते. बोरिवली स्टेशन लोकल ट्रेनसाठी मोठं टर्मिनस बनलं आहे, पण लांब पल्ल्याच्या जवळपास सगळ्याच गाड्या इकडे हॉल्ट करतात, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. पायलट प्रोजेक्टमध्ये ठराविक ट्रेनचा हॉल्ट बोरिवलीहून काढून अंधेरी किंवा वसईला दिला जाईल.
पीक अवर्समध्ये लांब पल्ल्यांच्या ट्रेनमुळे प्लॅटफॉर्मवर उभं राहायलाही जागा पुरत नाही, ज्यामुळे बोरिवलीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण येत आहे. या ट्रेनच्या हॉल्टमध्ये बदल केला तर त्याचा फायदा होईल. मुंबई सेंट्रलहून खूप कमी जण ट्रेनमध्ये बसतात, त्यामुळे दादर स्टेशनवरून ट्रेन सुरू झाली तर लाभ होईल. काही ट्रेनचे हॉल्ट अंधेरी केला तर सांताक्रुझ आणि विलेपार्लेच्या लोकांची समस्याही दूर होईल. तर भाईंदरला राजस्थानच्या ट्रेनना हॉल्ट देण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे, यात वसईला हॉल्ट दिला तर विरार, भाईंदरमध्ये राहणाऱ्यांचाही वेळ वाचेल.
वांद्रे आणि दादरप्रमाणे वसई आणि जोगेश्वरीमध्येही दोन नवीन टर्मिनस तयार होत आहेत. मानसून आधी या कामासाठीचं टेंडर निघणार आहे. जोगेश्वरीचं नवीन टर्मिनस जून 2024 पर्यंत तयार करण्याचं लक्ष्य आहे. यासाठी जवळपास 69 कोटी रुपये खर्च येणार आहे. या टर्मिनसवर 24 कोचची ट्रेन थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी टर्मिनसहून सुरवातीला 10-12 ट्रेन ऑपरेट करण्याची योजना आहे. यातल्या बहुतेक ट्रेन या मुंबई सेंट्रलऐवजी जोगेश्वरीहून सुटतील. पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल.
जोगेश्वरी टर्मिनसवर 600 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद प्लॅटफॉर्म बनवले जातील. ट्रॅकच्या दोन्ही बाजूला हे प्लॅटफॉर्म असतील, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येईल. या टर्मिनसवरून ट्रेनना बोरिवलीच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या लाईनला कनेक्ट केलं जाईल. सध्या जोगेश्वरीमध्ये काही मालगाड्यांमध्ये सिमेंट भरलं जातं. वसई टर्मिनसचं काम सुरू व्हायला आणखी वेळ लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway