मुंबई, 8 ऑक्टोबर : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. या कारवाईची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी (NCB)वर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता नवाब मलिक शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात नवी माहिती उघड करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला. त्यानंतर तातडीने एनसीबीने सुद्धा पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले. त्यानंतर आता राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या संदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं, "एनसीबीच्या सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईच्या संदर्भात मला माहिती उघड करायची आहे आणि त्यासाठी माहिती गोळा करायला थोडा वेळ लागणार आहे. यााठी पत्रकार परिषद शुक्रवार ऐवजी शनिवारी आयोजित केली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद होईल." आता नवाब मलिक कुठला नवा गौप्यस्फोट करतात हे पहावं लागेल.
एनसीबीवर गंभीर आरोप
नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, शनिवारी एनसीबी (NCB) ने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. 'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
वाचा: Cordelia क्रूझवर धाड प्रकरणात NCB ची मुंबईत मोठी कारवाई, परदेशी नागरिकाला अटक
'कारवाईच्या संदर्भातील जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडीओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडीओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.
तसेच हा व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं.
आर्यन खानसोबत दिसलेला मोहन भानुशाली म्हणाला...
नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, 2 ऑक्टोबर रोजी आर्यनसोबत दिसणारी व्यक्ती मोहन भानुशाली आहे, जो भाजप नेता आहे, असा आरोप केला. नवाव मलिक यांनी आरोप केल्यानंतर मोहन भानुशाली समोर आलेत. भानुशाली यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. भानुशाली म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचा पक्षाशी काहीही संबंध नाही, सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. मोहन भानुशालीनं वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटलं की, "राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. भाजपचा याच्याशी (अटक) काहीही संबंध नाही. 1 ऑक्टोबर रोजी मला माहिती मिळाली की ड्रग्ज पार्टी होणार आहे. अधिक माहिती गोळा करण्यासाठी मी NCB अधिकाऱ्यांसोबत क्रूझवर गेलो होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drug case, Nawab malik, NCB