Home /News /mumbai /

Mumbai Corona : मुंबईकरांना मोठा दिलासा! धारावीत कोरोनाचा दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही

Mumbai Corona : मुंबईकरांना मोठा दिलासा! धारावीत कोरोनाचा दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही

मुंबईच्या धारावी परिसरात आज एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्या लाटेत धारावीत रुग्णसंख्या शून्य होईपर्यंत 269 दिवस लागले होते.

मुंबई, 28 जानेवारी : मुंबईने आतापर्यंत प्रचंड आघातं सोसली. मुंबई कित्येक संकटांना सामोरे गेली. दहशतवादी हल्ले, साखळी बॉम्बस्फोट ते नव्वदच्या काळातले गँगवार. सर्व सोसूनही मुंबई पुन्हा उभी राहते. मुंबईचं हे उभं राहणं, यालाच स्पिरिट म्हणतात. या स्पिरिटने अनेकांना भुरळ घातलीय. त्यामुळे मुंबईचं हे स्पिरिट अनुभवण्यासाठी जगभरातील लोकं मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, लोकल ट्रेनमध्ये फिरायला येतात. विशेष म्हणजे या कोरोना संकट काळात मुंबई लॉकडाऊन झाली होती. या संकटाने मुंबईला प्रचंड जखमी केलं. हजारो मुंबईकरांनी जवळच्या माणसांना गमावलं. कुणी आई, कुणी वडील, भाऊ, मित्र असं अनेकांना गमावलं. करोनाची दुसरी लाट तर प्रचंड भयानक होती. या भयावह काळात प्रशासन आणि सरकार एकजुटीने काम करत होतं. त्याचेच पडसाद या तिसऱ्या लाटेत बघायला मिळालं. कोरोनाची तिसरी लाट प्रचंड वेगाने पुढे सरकली. पण तितक्याच वेगाने ती खालीदेखील कोसळली. या दरम्यान प्रशासनाने केलेल्या कामांना डोळेझाक करता येणार नाही. विशेष म्हणजे कोरोनाची ही तिसरी लाट ओसरत असल्याचं चित्र मुंबईत आहे. कारण मुंबईच्या धारावीसारख्या ठिकाणी आज दिवसभरात कोरोनाचा एकही नवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. मुंबईत दिवसभरात 1312 नवे रुग्ण राज्यात सर्वात आधी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक प्रचंड मोठी वाढ झाली होती. कोरोनाबाधितांची आकडेवारी दररोज वाढत होती. दररोज 20 ते 25 हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. अखेर ही लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. जितक्या गतीने लाट पुढे सरकली तितक्याच गतीने ही लाट खाली कोसळली. मुंबईत आज दिवसभरात 1312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 5990 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आजच्या घडीला सध्या 14 हजार 344 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्ण दुप्पटीचा दर 259 दिवसांवर गेला आहे. (पुणेकरांना मोठा दिलासा, कोरोना कमी होतोय) मुंबईच्या धारावी परिसरांत आज शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या लाटेत धारावीत रुग्णसंख्या शून्य होईपर्यंत 269 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 119 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शुन्य झाली होती. पण या तिसऱ्या लाटेत 31 दिवसांनंतर धारावीमध्ये रुग्णसंख्या शून्यावर पोहोचली आहे. याचाच अर्थ ही तिसरी लाट ओसरायला लागली असून हिचा कालावधी हा कमी दिवसांचा आहे, असं स्पष्ट होताना दिसत आहे. मुंबईत धारावी हा सर्वात मोठा झोपडपट्टी परिसर आहे. इथे प्रचंड दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे या परिसरात संसर्ग थोपविणं हे प्रशासनापुढे मोठं आव्हान होतं. धारावी पाठोपाठ दादरमध्ये आज दिवसभरात 3 रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहिममध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद झाली. पुण्यात दिवसभरात 3 हजार 374 नवे रुग्ण विशेष म्हणजे आता पुण्यातही नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घसरताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यातली कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, असं म्हणायला तरी हरकत नाही. पण तरीही रात्र वैऱ्याची, संकट अजून संपलेलं नाही. कोरोनाचा संसर्ग पु्न्हा वाढू शकतो. त्यामुळे आपण काळजी जरुरच घेतली पाहिजे. पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 374 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात 8 हजार 200 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे पुण्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता 36 हजार 340 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये घरी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या