धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 1 एप्रिल : असंख्य मुंबईकरांना वेळेवर कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडावं लागतं. सकाळच्या गडबडीमध्ये त्यांना घरातून डबा नेणं शक्य होत नाही. नोकरदार मुंबईकरांची ही अडचण दूर करण्याचं काम डबेवाले गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. मॅनेजमेंट गुरू म्हणून संपूर्ण विश्वात ओळख असलेले डबेवाले 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात भर पडणार आहे.
काय आहे कारण?
कोरोना व्हायरसचे निर्बंध उठल्यानंतर सर्वच सण आणि उत्सव नेहमीच्या पद्धतीनं साजरे केले जाणार आहे. बहुतांश डबेवाले 3 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीमध्ये आपआपल्या गावांमधील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे 6 दिवस सुट्टीवर जाण्याचा निर्णय डबेवाले संघटनेनं घेतलाय, 10 एप्रिलपासून ते पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.
कपाळी टिळा, राम-कृष्ण हरीचा जप! 20 रुपयात नाश्ता देणारा कोण आहे ग्रॅज्युएट वारकरी? पाहा Video
मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. या गावांध्ये कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले गावी जाणार आहेत.
4 दिवसच त्रास
डबेवाले 6 दिवस सुट्टीवर असले तरी या कालावधीत महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांना 4 दिवसच त्रास सहन करावा लागेल. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, यांना सुट्टी लागली आहे त्यामुळे त्या डब्यांची सेवा बंद आहे. तसं सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे त्यांची ही सेवा काही प्रमाणात कमी झाली आहे.
डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार असल्याने मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. 'ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये,' अशी विनंती “मुंबई डबेवाला संघटनेचे” प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.