मुंबई, 27 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेत नवा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणाबाबत नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केला आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करचा समावेश होता. तो समीर वानखेडेंचा मित्र आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
तो दाढीवाला तिहारच्या कारागृहात होता, राजस्थानमधील कारागृहातही शिक्षा भोगत होता. हाच दाढीवाला समीर वानखेडे यांचा मित्र आहे. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराचा संबंध आहे असा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
माझ्याकडे क्रूझवरील ड्रग्ज माफीयांच्या डान्सचा व्हिडीओ आहे, या ड्रग्ज माफीयाला हात लावले नाही बाकीच्यांना पकडले आहे. चौकशी होत आहे आम्ही त्यावर बोट दाखवणार नाही. जर एनसीबीने दखल घेतली नाही तर मला काही गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील. ट्रॅप लावून कारवाई करण्यात आली. क्रुझवरील साडे तेराशे लोकांना सोडून अवघ्या 12-13 लोकांनाच का पकडण्यात आले? असा सवालही नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर या क्रूझवरील पार्टीत उपस्थित होता. या ड्रग्ज तस्कराची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर उपस्थित होती. या पार्टीच एक दाढीवाला व्यक्ती कोण आहे याकडे लक्ष द्यावे. आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया यामध्ये होता. जो दाढीवाला आहे त्याचे वानखेडे सोबत चांगले संबध आहेत. दिल्लीवरुन मुंबईत येणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
सर्वांचा सीडीआर तपासावा
नवाब मलिकांनी म्हटलं, काल मी माध्यमांसमोर बोलत असताना मला जे पत्र मिळाले होते ते मी एनसीबी डीजी यांना पाठवले.
आरोपांची दखल घेणं गरजेचं आहे. या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. माझी मागणी आहे की समीर वानखेडे, के पी गोसावी, प्रभाकर आणि समीर वानखेडेंच्या ड्रायव्हरचा सीडीआर मागवण्यात यावा. ज्या गाडीचा वापर झाला आहे इलेक्ट्रीकल तपासणी झाली पाहीजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी एनसीबीकडे केली आहे.
ज्यावेळी एखादा अभिनेता, अभिनेत्री एनसीबी कार्यालयात चौकशीला येत होती, त्यामध्ये एकालाही अटक झाली नाही. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या मी समोर आणणार आहे. क्रूझ पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. क्रूझवर धाड टाकण्यात आली नव्हती तर टार्गेटेड लोकांना यामध्ये पकडले आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांकडून परवानगी न घेता क्रूझ पार्टी आयोजित करण्यात आली होती.
क्रूझवरील सीसीटीव्ही तपासावे
नवाब मलिकांनी म्हटलं, क्रूझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. सीसीटीव्हीतून पर्दाफाश होईल. जगातील सर्वांत मोठा ड्रग्ज माफीया यामध्ये आहे. दिल्लीमधून एनसीबीचं पथक येत आहे, मी फक्त क्ल्यू दिला आहे. खेळ संपला मात्र, आरोपी मोकाट फिरतोय.
वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमक्या येतायत
एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला आहे.
जन्म दाखला जर खोटा असेल तर खरा जन्म दाखला कुठे आहे ते त्यांच्या कुटुंबीयांनी सांगावे. मी आज मॅरिज सर्टीफिकेट ट्विट केले आहे. जबाबदारी ने सांगतो जे कागदपत्रे आहेत ते सर्व कागदपत्रे खरे आहेत. हा हिंदू मुस्लीम वाद नाही. जर धर्म परिवर्तन केले तर जात समाप्त होते. त्यांनी बनावट कागदपत्रे बनवले त्यांची नोकरी जाणार, खोटी कागदपत्रे बनवली तर 2 ते 4 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Nawab malik, NCB