मुंबई, 18 एप्रिल: राज्यातील कोरोना स्थिती (Corona Cases in Maharashtra) अतिशय चिंताजनक आहे. दिवसाला साठ हजाराहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. शनिवारी तर 67 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने साठ हजाराच्या जवळपास असलेला रुग्णांचा आकडा आता 70 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने सापडणाऱ्या या रुग्णांना बेड (Availability of Bed For Corona Patients) मिळणे कठीण झालं आहे. जवळपास सर्वत्र खाटांची संख्या कमी पडत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला नेमकं कुठं न्यायचं, असा प्रश्न नातेवाईकांना पडतो आणि त्यांचा गोंधळ उडतो. यासाठी मुंबईतील प्रशासनाने रुग्णालयातील बेडची उपलब्धता घरबसल्या तपासण्यासाठी एक लिंक तयार केली आहे. ज्याद्वारे आपल्याला नेमका कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सादरीकरणात सांगितले की, येत्या आठवड्यात शहरातील 156 रुग्णालयांमधील बेडची संख्या सध्याच्या 20,504 खाटांवरून 22,000 करण्यात येईल, तर सध्या 4,122 बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली.
हे वाचा - Gold Silver Price : 15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं?
पालिका प्रशासनाने रुग्णांना डॉक्टरांच्या नियमित देखरेखीखाली जंबो कोरोना केंद्रामध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळांनाही 24 तासात चाचणी अहवाल जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण माहिती खाटांची माहिती घेऊ शकतो. ही लिंक दर 2 तासांनी अपडेट केली जात असते. >> https://mumgis.mcgm.gov.in/Resources/COVIDBeds/bedTracker.html.<<
दरम्यान, मुंबईत शनिवारी 8 हजार 834 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 70 हजार 832वर पोहोचला आहे. शनिवारी 52 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 294वर पोहोचला आहे. 6 हजार 617 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 69 हजार 961 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 87 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 44 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 94 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 1 हजार 169 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 48 लाख 99 हजार 5 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona updates, Covid-19, Mumbai News, Tech news, Technology