मुंबई, 16 मे : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आधी पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मात्र नंतरच्या काळात राजधानी मुंबईतही कोरोना येवून धडकला आणि आता तर मुंबई शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्या वाढत आहे. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये वाढत असलेला कोरोना संसर्ग प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर निर्बंधांमध्ये शिथिलता आणत काही गोष्टींना परवानगी देण्यात आली. त्यामुळे राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतूनही परराज्यातील अनेक मजूर आपल्या गावी निघत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरून गुरुवारी रात्री मुझफ्फरला एक ट्रेन सोडण्यात आली. या रेल्वे गाडीने गेलेल्या 1429 प्रवाश्यांपैकी तब्बल 1100 प्रवासी झोपडपट्टी भागातील होते. त्यातही 1100 पैकी 600 जण हे धारावीतील 24 हाय-रिस्क परिसरातील होते. त्यामुळे धारावीसारख्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील हे प्रवासी पुढे जावून कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत 'मुंबई मिरर'ने वृत्त दिलं आहे.
हेही वाचा - चॉकलेट खाण्याच्या प्लॅनमुळे मित्र गमावला, मुंबईतील अपघातात धक्कादायक खुलासा
दरम्यान, मुंबईतून सोडण्यात येणाऱ्या मजुरांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र मुंबईत आतापर्यंत सापडलेल्या अनेक कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणं आढळली नव्हती. मात्र त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाची लक्षण नाहीत म्हणून प्रवासाला परवानगी मिळालेले हाय-रिस्क भागातील हे मजूर भविष्यात कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हे प्रवासी त्यांच्या-त्यांच्या राज्यात पोहोचताच त्यांना क्वारन्टाइन करण्याची गरज असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे