मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ (Mission Begin Again) अंतर्गत आता भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, जे भायखळा प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखले जाते ते लवकरच सुरू होणार आहे. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 15 फेब्रुवारी 2021 पासून भायखळा प्राणीसंग्रहालय पुन्हा सुरू होणार आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेलं प्राणीसंग्रहालय आता तब्बल 11 महिन्यांनी उघडणार आहे. पण प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी उघडण्यात आले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 200 हून अधिक विदेशी पक्ष्यांना बंदिस्तच ठेवलं जाणार आहे. त्यांना मोकळं सोडण्यात येणार नाही. तर वाघ, पेंग्विन आणि बिबट्यांसारख्या इतर प्राण्यांना मोकळं सोडलं जाईल.
भायखळा प्राणीसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राणीसंग्रहालय हे पुन्हा प्रत्येक स्पॉट्सवर योग्य सामाजिक अंतर राखून आणि सॅनिटायझर उपलब्ध करून मगच उघडण्यात येईल. कोविड 19 च्या सर्व सूचनांची विशेष काळजी घेण्यात येईल. तसेच आम्ही प्राणीसंग्रहालयात गर्दीचे नियोजन करू आणि गर्दी वाढताना दिसली, तर प्राणिसंग्रहालयात प्रवेश काही काळ थांबवला जाईल.”
हे देखील वाचा - भिवंडीतील गांजा रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाची धडक कारवाई
दरम्यान, गर्दी होऊ नये म्हणून घोषणांसाठी पब्लिक अॅड्रेस (PA) यंत्रणादेखील असेल. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात विविध ठिकाणी कोरोना जनजागृती बद्दल पोस्टर्स आणि सूचना देखील लावल्या जातील.
राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत व्यावसायिक कामांना गती मिळावी व उद्योगधंद्यात पुन्हा वाढ व्हावी यासाठी दुकाने, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि थिएटर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तशी अधिकृत परवानगीच मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्याच आधारावर आता प्राणीसंग्रहालयाकडून परवानगीची मागणी करण्यात येत होती.