मुंबई, 14 मार्च : मुंबईतील सीएसएमटी परिसरात पूल कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केलं आहे. तसंच 'मनसेनं सनदशीर मार्गाने या यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. पण, सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे' असा संतापही व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकामध्ये त्यांनी रेल्वे मंत्री आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला. 'सीएसएमटी येथील दुर्घटना दुर्दैवी आहे. त्या घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत', अशी भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली.
'2017 साली एल्फिस्टन स्थानकातील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला. जुलैमध्ये अंधेरीत एक पूल कोसळला त्यावेळी मनसेनं रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी मुंबईतल्या पुलांचं आॅडिट करण्याचं आश्वासन रेल्वे अधिका-यांनी दिलं होतं. पण, मुंबई महापालिकेनं देखील या कामात सहकार्य करावं,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. म्हणूनच मी महापालिका आयुक्तांना भेटलो त्यांनी देखील सहकार्याचं आश्वासन दिलं. पुढे काहीच घडलं नाही, हे आज सिद्ध होतं आहे', अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
#MumbaiBridgeCollapse pic.twitter.com/3HBJNooJST
— Raj Thackeray (@RajThackeray) March 14, 2019
नेहमी प्रमाणेच रेल्वे मंत्री ट्विट करून चौकशीचे आदेश कसे दिलेत याची टिमकी वाजवतील आणि जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सनदशीर मार्गाने या यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे' असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान,मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 15- 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये झाहीद खान (वय 32), तपेंद्र सिंग (वय 35), अपूर्वा प्रभू (वय 35 ) आणि रंजना तांबे (वय 40), सारिका कुलकर्णी ( वय 35) आणखी दोघांचा अशा 5 जणांचा समावेश आहे. पुलाच्या खालच्या बाजूची स्लॅब सरळ रस्तावर पडल्याने त्याखाली अनेक जण दबले गेले. पुलाच्या खालच्या भागापैकी 60 टक्के भाग कोसळला.
==========================