Home /News /mumbai /

जमावबंदीच्या आदेशानंतर 'मुंबई बाग' आंदोलन तुर्तास स्थगित

जमावबंदीच्या आदेशानंतर 'मुंबई बाग' आंदोलन तुर्तास स्थगित

दिल्लीत शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही नागपाडा इथं 'मुंबई बाग' आंदोलन सुरू झाले होते.

    मुंबई, 23 मार्च : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात देशभरात आंदोलनांचा भडका उडाला होता. दिल्लीत शाहीन बाग आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईतही त्याच धर्तीवर नागपाडा इथं 'मुंबई बाग' आंदोलन सुरू झाले होते. परंतु, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे तुर्तास मुंबई बाग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनची घोषणा केली. ही घोषणा करत असताना राज्यात कलम 144 जमावबंदीचे आदेशही लागू केले. त्यामुळे राज्यात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. कोरोना व्हायरसच्या खबरदारीबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अखेर गेल्या दीड महिन्याहून जास्त काळ सुरू असलेल्या 'मुंबई बाग' म्हणजेच नागपाडामधील आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलं आहे. मध्यरात्री जमावबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर आंदोलक महिला घरी परतल्या. कोरोनाची लागण होण्याची भीती आणि 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. CAA आणि NRC विरोधात दिल्लीत शाहीन बाग परिसरात अभिनव आंदोलन सुरू झाले होते. या परिसरातील महिला जोपर्यंत CAA कायदा रद्द करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असं सांगत एकत्र आल्या. या आंदोलनात कोणताही मोठा नेता नेतृत्त्वासाठी पुढे नसतानाही महिला एकत्र आल्या. त्यामुळे या आंदोलनाची मोठी चर्चा झाली. दिल्लीतील आंदोलनाला अजूनही स्थगिती देण्याचा निर्णय घेतला नाही. याच आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरातील महिलांनी 'मुंबई बाग' या नावाने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता. घर, संसार सांभाळून या महिलांनी योग्य नियोजन करून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त इथं तैनात केला होता. राज्यातील परिस्थिती आणि जमावबंदीच्या आदेशामुळे तुर्तास हे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या