मुंबई, 23 जानेवारी: शिवसेना आणि मनसे यांच्यातील पोस्टरबाजी सर्वांना माहिती आहे. मुद्दा कोणताही असो दोन्ही पक्षातील नेते पोस्टरच्या माध्यमातून एकमेकांना टोला लगावण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ठाकरे चित्रपट येत्या 25 जानेवारीला होणार आहे. आज बाळासाहेबांची जयंती आहे. चित्रपट आणि बाळासाहेबांची जयंती या दोन्हीचा योग साधून मनसेने सेनेला टोला लगावला आहे. मनसेने ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा देणारे पोस्टर दादरमध्ये लावले आहे. पण या शुभेच्छा देताना 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा', असा उल्लेख केला आहे.
या चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर त्याचे दिग्दर्शन अभितीत पानसे यांनी केले आहे. मनसेने पोस्टरमध्ये निर्माते संजय राऊत यांचा उल्लेखच केला नाही. राजकीय पडद्यावर शिवसेना आणि मनसे यांची युती अद्याप झाली नाही. पण ठाकरे चित्रपटाच्या निमित्ताने या दोन्ही पक्षाची अनोखी युती पाहायला मिळत आहे. पण त्यातही मनसेने सेनेला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
ठाकरे चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा नवाझुद्दीन सिद्धीकी साकारत आहे. तर माँ साहेब मीनाताई ठाकरे यांची भूमिका अमृता राव साकारत आहे. येत्या 25 जानेवारी रोजी मराठी आणि हिंदीत या दोन भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
VIDEO : खून करायचा का माझा? जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची