मुंबई, 30 जानेवारी : लायटरचा धाक दाखवून मोबाईल चोरी केल्याची थरारक घटना मुंबईत घडली आहे. हा प्रकार खराखुरा सुरू आहे का चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे, हेदेखील घटनास्थळी उपस्थित असल्यांना कळालं नाही. अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीमधल्या ट्विंकल अपार्टमेंटमधल्या स्टाईल शॉप या मोबाईलच्या दुकानात तरुण गेला. दुकानात त्याने मोबाईलबाबत विचारायला सुरुवात केली. यानंतर 85 हजारांच्या मोबाईलबाबत या तरुणाने दुकानदाराकडे चौकशी केली. बराच वेळानंतर मग त्याने मागे ठेवलेली पिस्तूल काढली आणि दुकानदारापुढे रोखली. पिस्तुलाचा धाक दाखवून तरुण दुकानातून मोबाईल घेऊन पळाला.
यानंतर दुकानदाराने ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार नोंदवली, यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. दुकानातले 5 सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी दुकानाच्या बाहेरचा सीसीटीव्ही तपासला तेव्हा एक तरुण पळून जाताना दिसला. यानंतर पुढचा तपास केला असता पोलिसांनी दानीश जमील खान याला ताब्यात घेतलं. या तरुणाने आपण मोबाईल चोरल्याचं कबूल केले. तसंच मोबाईल चोरताना वापरलेली पिस्तूल नव्हती, तर पिस्तुलाच्या आकाराचा लायटर असल्याचंही त्याने सांगितलं.
दानिश हा अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत राहत असून तो जिम ट्रेनर आहे. तर त्याचे वडील फिल्मसिटीमध्ये असिस्टंट डायरेक्टर आहेत. एकुलता एक असल्यामुळे त्याचे घरामध्ये खूप लाड व्हायचे. गेल्या काही वर्षांपासून तो आयफोन वापरत आहे. पण नवीन मोबाईल पाहिजे म्हणून तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. वडील फिल्मसिटीमध्ये कामाला असल्यामुळे घरामध्ये पिस्तुलासारखा दिसणारा लायटर होता. याच लायटरचा वापर करून दानिशने महागडा मोबाईल चोरला. या प्रकरणी दानीशला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.