मुंबई, 16 जून : राज्यात कोरोनाव्हायरसचे (coronavirus) सर्वात जास्त रुग्ण आहेत ते मुंबईत (mumbai). शहरातील धारावी (dharavi) हा आतापर्यंत कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून आता मुंबई शहरातील या भागापेक्षा मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागलेत. मुंबई उपनगरातील अंधेरी (andheri) आणि दहिसर (dahisar) हे प्रभाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागलेत.
अंधेरी पूर्व भागात कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आता या परिसरात 4076 कोरोना रुग्ण आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील कोरोनाचे सुरुवातीचे हॉटस्पॉट असलेल्या धारावी, वरळी, कुर्ला, भायखळा या प्रभागातही अजून 4000 रुग्ण संख्या नाही. इतक्या झपाट्याने अंधेरी पूर्वेत कोरोनाग्रस्त वाढलेत.
हे वाचा - कोरोनावर 'हा' पर्याय स्वीकारल्यास भारतात मृत्यूचं तांडव माजेल, म्हणून...
तर मुंबईत जवळपास दोन आठवड्यांपूर्वी जी उत्तर वॉर्ड म्हणजे धारावी, माहीम, दादर या परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. तर आर उत्तर वॉर्ड म्हणजे दहिसरमध्ये कोरोना संक्रमणाचं सर्वात कमी प्रमाण होतं. आता हे चित्र बदलताना दिसतं आहे. या प्रभागात 13 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होते आहे. नव्या रुग्णवाढीचा दर 5.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दादर, भायखळा या ठिकाणी आता 40 दिवसांनी रुग्ण दुप्पट होऊ लागलेत. या क्षेत्रात नव्या रुग्णवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ या भागात नवे कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर कमी
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 27 मे रोजी मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17 टक्के होता. जो 2 जूनला 3.64 टक्के झाला आहे. तर 15 जून रोजी 2.49 टक्के झाला आहे. तसंच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही आता 28 दिवसांवर गेला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.
हे वाचा -सध्या मुंबईत येण्याचे धाडस करू शकत नाही - नितीन गडकरी
राज्य सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा भराभर वाढतो आहे. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - सावधान! तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर? CBI नं केलं अलर्ट