मुंबई, 30 जानेवारी : मुंबईत (Mumbai) 28 जानेवारीला घडलेली घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कारण एका तरुणाने चक्क लायटरचा धाक दाखवत मोबाईलच्या दुकानात चोरी केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.
अंधेरी येथील उच्चभ्रू वस्तीतील स्टाईल शॉप ट्विंकल अपार्टमेंटमधील मोबाईलच्या दुकानात एक तरुण आला. त्याने दुकानातील काही मोबाईलबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. शेवटी 85 हजार रुपये किंमत असणाऱ्या नवीन मोबाईलबाबत त्या तरुणाने दुकानदाराकडे विचारपूस केली. थोडा वेल लोटल्यानंतर आजुबाजूला पाहून त्या तरुणाने मागे खोचलेली बंदूक काढली आणि दुकानदारावर रोखली अन् त्याच्या हातात असलेला मोबाईल फोन घेऊन त्या तरुणाने दुकानातून पळ काढला.
तरुण थोडा लांब जाताच दुकानदाराने आरडा ओरडा करत इतर दुकानदारांना गोळा केलं आणि घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. सर्व दुकानदार सामाजिक कार्यकर्ते संदेश देसाई यांच्याकडे गेले आणि त्यांनाही घडलेला प्रकार कळवला. पीडित दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते संदेश देसाई आणि व्यापारी यांनी तात्काळ ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत रितसर तक्रारार नोंदवली. त्यानुसार ओशिवारा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांनी तपासाकरता एक टीम बनवून तपास सुरू केला.
ज्या मोबाईल दुकानात बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल चोरी केली गेली होती त्या दुकानात 5 सीसीटीव्ही कॅमेरे होते, ते सुरूही होते, पण त्या कॅमेऱ्याचे फुटेज रेकॉर्ड करणारी यंत्रणा बिघडली होती. परिणामी कॅमेरा सुरू असतानाही बंदुकीचा धाक दाखवत झालेली मोबाईल चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही. त्यामुळे तपास कसा करायचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. पण पोलिसांनी दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक तरुण त्यांना पळताना दिसला.
हेही वाचा - ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवणाऱ्याला अखेर दणका, गुन्हा दाखल
त्यानुसार अधिक तपास केला असता त्या तरुणाबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी दानिश जमिल खान नावाच्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्टाईल शॉप ट्विंकल अपार्टमेंटमधील मोबाइलच्या दुकानातून 85 हजारांचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. पण तो मोबाईल बंदुकीने नाही तर लायटरचा धाक दाखवून चोरला आहे, हे त्याने चौकशीत सांगितले आणि पोलीसही चक्रावून गेले.
कोण आहे हा तरुण?
दानिश जमिल शेख हा तरुण अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत राहतो. दानिश हा जिम ट्रेनर आहे. तर त्याचे वडील हे फिल्मसिटीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतात. दानिश एकुलता एक असलेल्या दानिशचे सर्व हट्ट कुटुंबीय पुरवायचे.. त्याचे खुप लाड करायचे...गेल्या काही वर्षांपासून दानिश आयफोन कंपनीचा मोबाइल वापरत होता. त्याला आता नवीन मोबाईल घ्यायचा होता. यामुळे दिवसेंदिवस तो अस्वस्थ होत होता.
दानिशचे वडील फ्लिमसिटीमध्ये असल्याने त्याच्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळी घरात असलेल्या एका वेगळ्याच गोष्टीवर दानिशची नजर पडली, ती म्हणजे सिगारेट पेटवणारे पिस्तुल. अगदी हुबेहुब पिस्तुलीसारखे असलेले लायटर पाहिल्यानंतर कुणालाही ते लायटर आहे यावर विश्वास बसणार नाही.
याच लायटरच्या मदतीने दुकानात दरोडा टाकून एक महागडा मोबाइल चोरण्याचे दानिशने ठरवले. ठरल्या प्रमाणे दानिश मोबाईल दुकानात पोहोचला आणि त्याने बंदुकीसारख्या दिसणाऱ्या लायटरचा धाक दुकानदाराला दाखवला आणि दानिशने SAMSU S 21 हा महागडा मोबाईल चोरुन पळ काढला
पोलिसांना दानिशने सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी दानिशनला घटनास्थळी नेले आणि दुकानदारासमोर उभे केले असता दुकानदाराने दानिशनेच मोबाईल चोरला असल्याचे सांगितले. पण जेव्हा दानिशने तो मोबाईल लायटरचा धाक दाखवून चोरला हे दुकानदाराला कळाले तेव्हा त्या दुकानदारालाही धक्का बसला. पोलिसांनी दानिशला अटक केले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, मोबाईल चोरीच्या या घटनेचा तपास पोलिसांनी अगदी जलद गतीने केल्याने व्यापारी मंडळातर्फे ओशिवारा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांचा आणि ओशिवारा पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News, Mumbai police