सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 24 डिसेंबर : पंढरपूर येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवर मनसेनं टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्याला 151 रुपयांचं बक्षीस देणार असल्याची उपरोधिक टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा युतीत सेना सडली असं म्हटलं होतं, त्यानंतर त्यांनी युती होणार नाही सांगितलं होतं. परंतु, आज पंढरपूर इथं झालेल्या सभेत युतीचा निर्णय जनताच घेणार असल्याचं सांगितलं म्हणजे नेमकं काय असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थितीत केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्याला 151 रुपयांचं बक्षीस देणार असंही देशपांडेंनी जाहीर केलं आहे.
पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची आज सोमवारी विराट सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप सरकारवर घणाघात तर केला मात्र युतीचा सस्पेंस कायम ठेवला.
उद्धव म्हणाले, जागावाटप गेलं खड्ड्यात, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्याचं काय करायचं ते नंतर बघू, आम्ही आधी त्याबाबत घोषणा केलेलीच आहे. मात्र युती करायची की नाही याचा निर्णय जनताच घेईल असं सांगत त्यांनी युतीची दारं पूर्ण बंद झालं नाहीत हे दाखवून दिलं. मात्र कडक टीका करत शिवसेनेला गृहीत धरू नका हा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
========================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.