12 मार्च : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे. तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. त्यामुळे आणखी झाडांची कत्तल करावी लागणार की काय असा प्रश्न आहे.
आरे कॉलनी इथल्या मरोळ भागातील सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेपैकी अंडरपासच्या कामासाठी कायमस्वरूपी ५ हजार ३५२ चौरस मीटर लागणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने याबाबत आरे प्रशासनाला पत्र पाठवलं आहे.
आधीच आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन ताब्यात घेण्याबाबत आक्षेप घेतला गेला. नागरिकांनी कॉलनीतली झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलनसुद्धा केलं. त्यात आता पुन्हा १२ हजार चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता आरे प्रशासनाकडून मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेशन तात्पुरत्या स्वरूपात लागणारी जमीन संबंधित विभागास हस्तांतरित करणार आहे.