मुंबई, 23 ऑगस्ट: मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सूननं ब्रेक (Monsoon Break in Maharashtra) घेतला आहे. पुढील दहा दिवस राज्यातून मान्सून गायब असेल, अशी माहिती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं कमबॅक (Monsoon Comeback) होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र पावसानं उघडीप घेतली होती. त्यानंतर महिन्याच्या शेवटी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली आहे. असं असलं तरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा दणक्यात आगमन करण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा-कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं की, 'आठवडाभर सरी कोसळल्यानंतर राज्यातून पुन्हा मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. पण पावसाचं प्रमाण अत्यल्प असणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात. जुलै महिन्याच्या शेवटी वर्तवलेल्या सुधारित अंदाजात म्हटल्यानुसार, ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
मात्र पुढील किमान दहा दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याचंही होसाळीकर यांनी सांगितलं आहे. या आधीच मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Rain, Weather forecast