मुंबई, 08 जून : देशात आणि राज्यातही आगमन झाल्यानंतर आता मान्सूनच्या (Monsoon) सरी मुंबईत (Mumbai) कधी पोहोचणार याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र लवकरच ही प्रतीक्षा संपणार असून एक-दोन दिवसांतच मुंबईत मान्सूनच्या (Monsoon in Mumbai) सरी कोसळण्याचा अंदाज हवमान तज्ज्ञांच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं लवकरच मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रदेखिल मान्सूनच्या सरींनी व्यापला जाणार आहे.
(वाचा-तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज : सुरेश काकाणी)
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही आधीच यंदा मान्सूननं राज्यात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. शनिवारीच रत्नागिरीच्या हर्णेमध्ये मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरमधयला भागही मान्सूननं व्यापल्याचं पाहायला मिळालं. मात्र मुंबईत मान्सून कधी दाखल होणार याची सगळे वाट पाहत होते. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 तारखेनंतर मान्सून मुंबईत दाखल होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी मात्र मान्सून आज किंवा उद्याच मुंबईत येऊ शकतो असं म्हटलं आहे.
(वाचा-ठाकरे सरकारची मोठी घोषणा, आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!)
भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळनंतर किंवा उद्या मुंबईत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईत पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात ज्याठिकाणी मान्सून बरसला नाही, त्याठिकाणीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवमान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही आगामी 2 ते 3 दिवसांत मुंबईत आणि उर्वरित राज्यात मान्सून पोहोचणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालचा आणखी काही भाग इथंही आगामी 2-3 दिवसांत मान्सूनच्या सरी कोसळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
देशात म्हणजे केरळमध्ये 3 जूनला दाखल झालेला मान्सून वेगानं पुढं सरकला आणि शनिवारी म्हणजे 5 जून रोजीच राज्यात त्याचं आगमन झालं. त्यानंतर राज्यात आणि देशांत विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित राज्य आणि देशात अनेक भागांत मान्सूनच्या सरी बरसतील. हवमान विभागाच्या अंदाजानुसार यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai News, Mumbai rain, Rain