मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून बंड? 50 लाख नागरिकांच्या सह्या मिळाल्याचा काँग्रेसचा दावा

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून बंड? 50 लाख नागरिकांच्या सह्या मिळाल्याचा काँग्रेसचा दावा

50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याच आंदोलनातील एक भाग म्हणून सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

'कृषी कायद्याविरोधात मिळालेल्या या सह्यांचे एक निवदेन उद्या मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे,' अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की,  'जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते. 2 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले. हे कायदे शेतकऱ्यांना कसे उद्धवस्त करणारे आहेत याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवनवर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले आणि महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजपा सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील 10 हजार गाव खेड्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. या दरम्यान सह्यांची मोहिमही राबवण्यात आली. काँग्रेसचा या कायद्याविरोधात संघर्ष सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहील,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Published by: Akshay Shitole
First published: November 16, 2020, 8:37 PM IST

ताज्या बातम्या