नवी मुंबई, 16 जुलैः सध्या मुंबईकर आणि नवी मुंबईकर खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्भे येथील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. याच मुद्यावर सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. खड्डे बुजवले जात नसल्याने मनसेने पीडब्ल्यूडी विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. खड्डे बुजवण्याची मागणी करुनदेखील प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात येता पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाविरोधात मनसेनं त्यांच्या स्टाईलमध्ये खळ्ळ खट्याक आंदोलन केले.
सायन- पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. येथे अनेकदा नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा सांगूनही प्रशासनाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मनसेने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मागील 10 दिवसांत उरणफाटा व जुईनगर येथे खड्यांमुळे बाईक अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. मनसेने पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि खात्याचे मंत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पाण्याच्या खड्यांमध्ये होड्या सोडल्या होत्या. तसेच खड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा आयोजित करुन विजेत्या स्पर्धकांना कमळ आणि धनुष्यबाण बक्षिस म्हणून दिलं होतं. तसेच खड्ड्यांना मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, प्रविण पोटे यांची नावे दिली होती.
खळ्ळ खट्याळ आंदोलनात नितीन चव्हाण, श्याम ढमाले, विशाल भिलारे, राजेंद्र खाडे, नितीन खानविलकर या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक आहे.
हेही वाचाः
...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम
'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Potholes, Pwd office