मुंबई 10 ऑक्टोंबर : पुण्यात काल पहिल्या सभेत राज ठाकरे बरसण्याआधीच वरुणराजा बरसल्यानं राज ठाकरेंची सभा रद्द झाली होती. त्यामुळे मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात राज ठाकरेंच्या पहिल्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ही सभा मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर होत असल्याने राज काय बोलतील याची सगळ्यांना उत्सुकता होती. राज यांनी सरकारवर टीका करत मतदारांना सत्तेसाठी नाही तर विरोध पक्षासाठी मत देण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, मला सत्ता मिळणं शक्य नाही. मनसेला किमान विरोधी पक्ष बनवा म्हणजे किमान सरकारला आम्ही जाब विचारू. आत्तापर्यंत मतदारांकडे अशी मागणी कुणीही केली नसेल असंही ते म्हणाले. आपल्या 17 मिनिटांच्या भाषणात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ED आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकदाही उल्लेख केला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी व्हिडीओ प्रेझेंटेशन करून सरकारला घाम फोडला होता तसं यावेळी काहीही न करता त्यांनी मनसेच्या उमेदवारांना मतं द्या असं आवाहन केलं.
पुण्यातल्या पावसाचा उल्लेख करून ते म्हणाले, राज्य सरकारने सगळ्या शहरांचा पुरता विचका करून ठेवलाय. मतदारांना गृहित धरलं जातं. खड्ड्यांमध्ये पडून माणसांचा जीव जातोय मात्र त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. पुण्यात अर्धा पाऊण तासांच्या पावसाने सगळं शहर पाण्यात जातंय. लोकांची संवेनशीलता गेली कुठे असा सवालही त्यांनी केला. तुमच्या संवेदना मेल्यात का? असंही ते म्हणाले. भाजपला त्यांनी आपल्या भाषणात टार्गेट केलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, PMC बँकेत घोटाळा झाला. शेकडो लोकांचे पैसे बुडाले. त्यावर सर्व संचालक भाजपचे होते. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण? पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?
आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत.. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना त्यांच्या जाणिवांना? जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं? आपण सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार आहोत? मी सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधपक्षाच्या निर्मितीसाठी आलो आहे. सरकारला प्रश्न विराचण्याची आज गरज आहे. पण दुर्दैवाने राज्यात प्रबळ विरोधीपक्षच नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा