Home /News /mumbai /

दुकानावरील मराठी पाट्यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना मनसेचा इशारा, 'पाटीचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा'

दुकानावरील मराठी पाट्यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना मनसेचा इशारा, 'पाटीचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा'

Marathi boards on Shop: महाराष्ट्रातील दुकानावर मराठी पाट्या लावण्यात याव्यात या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

    मुंबई, 14 जानेवारी : महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर आता मराठी पाट्या (Marathi boards on shops) दिसणार आहेत. त्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. मात्र, या निर्णयावरुन आता राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीसोबतच मनसेने (MNS) या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर एमआयएम, व्यापारी संघटनांकडून या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने आक्रमक होत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये खळखट्याक इशारा दिला आहे. मनसेचे नते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "ज्या व्यापाऱ्यांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??". संदीप देशपांडे यांनी हे ट्विट करत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. एकूणच या मुद्द्यावर आता राज्यातील वातावरणही तापताना दिसत आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत, पाट्या कशा बदलणार? : इम्तियाज जलील खासदार इम्तियाज जलील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. मोठा तोटा होत आहे. भविष्यात काय होईल माहिती नाही, उद्या दुकाने आम्ही उघडू शकणार की नाही, लॉकडाऊन होणार का? अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर सरकार सांगत असेल की दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला. राज्य सरकारने स्वखर्चातून राज्यातील दुकानांच्या पाट्या बदलून द्याव्यात अशी मागणी करत खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे की, दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार ? दुकानदार असोसिएशनचाही विरोध मराठी पाट्यांच्या या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सुद्धा विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटलं, मराठी पाट्यांच्या सक्तीच्या विरोधात 2001 साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन या निर्णयाला स्टे देण्यात आला होता. आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण दुकानाची मोठी पाटी ही इंग्रजीत असायला हवी की मराठीत हा दुकानदाराचा निर्णय आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं दुकानावरील पाट्याही आता मराठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, MIM, MNS

    पुढील बातम्या