मुंबई,4 जानेवारी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष घणाघाती टोला लगावला आहे. 'मातोश्री' ते 'वर्षा' हा प्रवास करताना त्यांनी कुणाशी प्रतारणा केली नसावी अशी मी अपेक्षा करतो, असे राज यांनी म्हटले आहे. निमित्त होते व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन.
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बिटविन दी लाईन्स या प्रदर्शनात 150 व्यंगचित्र आहेत. राज ठाकरे यांनी प्रशांत कुलकर्णी यांनी रेखाटलेली व्यंगचित्र जवळून निहाळली. त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकीय टोला लगावला. कमीत कमी रेषांमध्ये व्यंगचित्र कसं असावं याचं उदाहरण म्हणजे फडणीसंच व्यंगचित्र असल्याचे राज यांनी सांगितले. एडॉल्फ हिटलरला व्यंगचित्राची भीती होती, असेही राज म्हणाले.
बाळासाहेबांचे व्यंगचित्र ठरले लक्षवेधी..
राज ठाकरेंनी प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. प्रशांत कुलकर्णी यांनी या प्रदर्शनात बाळासाहेबांच्या खास व्यंगचित्राची निवड केली आहे. या व्यंगचित्रांला रुद्राक्षांची माळ बाहेरून चिटकवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांचे व्यंगचित्र लक्षवेधी ठरले. बाळासाहेब यांचं व्यंगचित्र घरी घेऊन जाणार असल्याचे राज यांनी यावेळी सांगितले.
खातेवाटपावर काय म्हणाले राज..
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या खातेवाटप आणि इतर बाबींवर बोलायला स्पष्ट नकार दिला. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त गोरेगाव नेस्कोमध्ये मनसेचे महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे यावेळी काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.